५० कोटींची जमीन कवडीमोलाने !
शिर्डी । झुंझार न्यूज
शिर्डीतील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनीच्या व्यवहारावरून सध्या शहरात मोठी खळबळ उडाली आहे. बहुचर्चित कॅप्टन अशोक खरात याने खरेदी केलेल्या जमिनीच्या व्यवहारात मूळ मालकांची फसवणूक झाल्याचा आरोप करत, गोंदकर कुटुंबाने थेट अपर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे. या व्यवहारामुळे शिर्डीतील भूमी अभिलेख आणि मध्यस्थी करणाऱ्या दलालांचे धाबे दणाणले असून लवकरच या प्रकरणी मोठा गौप्यस्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
साकुरी-शिर्डी परिसरातील निघोज शिवारात, शिर्डी-शिव रस्त्यावरील पंचतारांकित हॉटेललगत असलेली ४ एकर जमीन कॅप्टन अशोक खरात आणि त्यांच्या पत्नीने खरेदी केली आहे. या जमिनीचे आजचे बाजारमूल्य साधारण ५० कोटी रुपयांच्या घरात आहे. मात्र, हा व्यवहार अत्यंत माफक दरात उरकण्यात आल्याचा आरोप होत आहे. २३ ऑगस्ट २०२३ रोजी हा खरेदीखत दस्त नोंदवण्यात आला होता.
या जमिनीचे मूळ मालक गोंदकर कुटुंब हे अशिक्षित आणि निरक्षर आहे. याचाच फायदा घेत काही मध्यस्थांनी खरात यांच्याशी हातमिळवणी करून हा व्यवहार घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कोट्यवधींच्या या व्यवहारानंतरही आज गोंदकर कुटुंबाच्या बँक खात्यात एक रुपयाही शिल्लक नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे जमिनीचे पैसे नक्की कोणाच्या घशात गेले? असा सवाल उपस्थित होत आहे.
गोंदकर कुटुंबाची पोलीस अधीक्षकांकडे धाव
न्याय मिळवण्यासाठी मूळ मालक परिगाबाई नानासाहेब गोंदकर (वयोवृद्ध आई) आणि सून ज्योती रावसाहेब गोंदकर यांनी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गोंदकर, नगरसेवक नंदू गोंदकर व रमेश गोंदकर यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची भेट घेतली. त्यांनी या संपूर्ण फसवणुकीचा घटनाक्रम पोलिसांना सांगितला असून, मध्यस्थांनी स्वतःचा मोठा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी वयोवृद्ध मालकांना अंधारात ठेवल्याचे म्हटले आहे.
याबाबत अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले की, “जमीन मालक आणि त्यांच्या नातेवाईकांनी माझी भेट घेऊन तोंडी तक्रार केली आहे. लवकरच या प्रकरणी ते लेखी तक्रार दाखल करणार आहेत. तक्रार प्राप्त होताच पोलीस कायदेशीर चौकशी सुरू करतील आणि फसवणुकीचा सर्व घटनाक्रम तपासात बाहेर येईल.”
खरात यांची ‘व्यावसायिक मेख’ आणि मध्यस्थांची धास्ती
साई मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेली ही ४ एकर जमीन अत्यंत मोक्याची आहे. भविष्यात शिर्डी जिल्हा झाल्यास या जमिनीला सोन्याचे मोल येणार आहे, शिवाय तिथे स्वतःचे पंचतारांकित हॉटेल उभारण्याचा खरात यांचा मानस असावा, अशी चर्चा आहे. या व्यवहारामुळे शिर्डीतील दलाल वर्गात भीतीचे वातावरण आहे. खरात यांनी या मालमत्तेसाठी कोणाकोणाला हाताशी धरले, याचा शोध घेण्यासाठी एसआयटी (SIT) चौकशीची मागणी होण्याची शक्यता आहे.

“गोंदकर हे माझे नातेवाईक असून ते अत्यंत गरीब व निरक्षर आहेत. त्यांच्या हक्काची जमीन फसवणूक करून लाटली गेली आहे. त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही हा लढा सुरूच ठेवणार आहोत.”
Pramod Gondkar, social activist
आता सर्वांचे लक्ष गोंदकर कुटुंबाकडून दाखल होणाऱ्या लेखी तक्रारीकडे लागले आहे. जर या प्रकरणी एफआयआर (FIR) दाखल झाला, तर शिर्डीतील अनेक मोठे चेहरे आणि जमिनीचे व्यवहार करणारे मध्यस्थ पोलिसांच्या कचाट्यात येण्याची दाट शक्यता आहे.





