पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते उद्घाटन;
माजी आमदार ॲड. उषाताई दराडे यांनी भूषवले अध्यक्षपद
संगमनेर । झुंझार न्यूज
ग्रामीण भागातील साहित्य परंपरेला उजाळा देण्यासाठी आणि नवोदित लेखकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी एकता फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेले ८वे एकता मराठी साहित्य संमेलन मंगळवार, दि. २४ मार्च २०२६ रोजी शिरूर कासार येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनाने बीड जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक वैभवात मोलाची भर घातली आहे.
या संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते करण्यात आले. तर संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखिका व माजी आमदार ॲड. उषाताई दराडे होत्या. ग्रामीण भागात आयोजित असूनही या संमेलनाला अकोला, सांगली, सातारा, अमरावती अगदी गोव्यापासून लेखक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संमेलनाचे उद्घाटक डॉ. तात्याराव लहाने यांनी आपल्या भाषणात ग्रामीण भागातील साहित्यिक परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, “आद्यकवी मुकुंदराज यांच्यापासून लाभलेला साहित्याचा वारसा जोपासण्याचे काम अशी ग्रामीण साहित्य संमेलने करत आहेत. गावाकडच्या मातीतील साहित्य जागतिक स्तरावर पोहोचण्याची ताकद या उपक्रमांतून निर्माण होते.
अध्यक्षा ॲड. उषाताई दराडे यांनी आपल्या मनोगतातून स्वतःच्या लेखनप्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी समकालीन सामाजिक विषयांवर आपले परखड व स्पष्ट मत मांडत लेखकांनी समाजाचे वास्तव मांडण्याचे आवाहन केले.
एकता फाउंडेशनने केवळ संमेलनच भरवले नाही, तर महाराष्ट्रभर ऑनलाईन पद्धतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना संमेलनादरम्यान मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. विशेषतः लहान मुलांनी केवळ एका मिनिटात आपले वक्तृत्व सादर करून उपस्थितांची मने जिंकली. राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या नवोदित लेखकांचाही सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या सोहळ्याप्रसंगी बोलताना डॉ. अक्षय कर्डिले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “सुमारे ४०० किलोमीटर अंतरावरून केवळ साहित्यावरील प्रेमापोटी लोक येथे एकत्र आले आहेत, हे पाहून थक्क व्हायला होते. माझ्यासारख्या साहित्याची फारशी पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीलाही या दिग्गज विचारमंचावर संधी दिल्याबद्दल मी एकता फाउंडेशनचा ऋणी आहे.”
एकता फाउंडेशनने गावपातळीवर मराठी स्नेहसंमेलन घेण्याचा जो उपक्रम हाती घेतला आहे, त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या संमेलनामुळे बीड जिल्ह्याच्या समृद्ध साहित्य वारशाचा अनुभव सर्वांना घेता आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एकता फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.