लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरमधील टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

शासकीय मदतीची वाट न पाहता पठार भागातील तहान भागवण्यासाठी राजहंस दूध संघाचा पुढाकार

संगमनेर । झुंझार न्यूज

संगमनेर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोठा आणि विस्तारलेला आहे. पठार भाग, प्रवरा पट्टा आणि तळेगाव पट्टा अशा तीन विभागांत विभागलेल्या या तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक गावांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागतात. मात्र, या संकटाच्या काळात ‘कुटुंबप्रमुख’ या नात्याने लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राजहंस दूध संघाने पुढाकार घेत टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केले आहेत. यामुळे पठार भागातील तहानलेल्या गावांना मोठा दिलासा मिळाला असून, राजहंसचे हे टँकर ग्रामस्थांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरत आहेत.

संगमनेर तालुक्यासह उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील १८२ दुष्काळी गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, यासाठी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अनेक संकटांवर मात करून निळवंडे धरण आणि त्यापुढील कालव्यांची कामे पूर्ण केली आहेत. निळवंडेच्या पाण्यामुळे अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला असून, कालव्याच्या वरील बाजूच्या शेतकऱ्यांनाही पाणी मिळावे यासाठी त्यांनी पायाभूत आराखडा तयार करून ठेवला आहे. ही शाश्वत सुविधा उपलब्ध करून देतानाच, तात्पुरत्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सहकारातील संस्थांना सोबत घेऊन थोरात सातत्याने कार्य करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढल्याने पठार भागातील गुंजाळवाडी पठार, वरुडी पठार, सारोळे पठार आणि डोळासने यांसारख्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाईची तीव्रता पाहता, शासनाच्या मदतीची किंवा कागदी घोडे नाचवण्याची वाट न पाहता, बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार राजहंस दूध संघाने तातडीने चार पाण्याचे टँकर तैनात केले आहेत. हे टँकर सध्या या गावांच्या वाड्या-वस्त्यांवर पाणी पोहोचवत असून, टँकर आल्यानंतर पाणी भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

 

येताना पाणी, जाताना दूध!

 

राजहंस दूध संघाच्या या उपक्रमाचे एक वैशिष्ट्य म्हणजे, हे टँकर येताना पिण्याचे शुद्ध पाणी घेऊन येतात आणि परतीच्या प्रवासात शेतकऱ्यांकडून दूध संकलित करून नेतात. दूध व्यवसायामुळे समृद्ध झालेल्या या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणीत धावून जाण्याची राजहंसची ही परंपरा याही वर्षी कायम राहिली आहे. या मदतीबद्दल पठार भागातील ग्रामस्थांनी आणि महिलांनी दूध संघ व्यवस्थापनाचे मनापासून आभार मानले आहेत.

संगमनेर आमचा परिवार – रणजीतसिंह देशमुख

 

“संगमनेर तालुका हा १७१ गावे आणि २५८ वाड्या-वस्त्यांचा मिळून एक मोठा परिवार आहे. या परिवारातील एकाही सदस्याला अडचण येऊ नये, ही लोकनेते बाळासाहेब थोरात यांची भूमिका आहे. सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता, प्रशासकीय प्रक्रियेत वेळ न घालवता आम्ही तात्काळ पिण्याचे टँकर उपलब्ध करून दिले आहेत. जनतेच्या विकासासाठी आणि सुख-सोयींसाठी राजहंस दूध संघ कायम कटिबद्ध आहे,” असे मत दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांनी व्यक्त केले.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *