श्री.बाळासाहेब थोरात , डॉ सुधीर तांबे , श्री.रणजितसिंह देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत १५०० तरुण शेतकरी दांपत्य होणार सहभागी

संगमनेर । झुंझार न्यूज

दुग्ध व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी संगमनेर तालुका पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. पंजाब मिल्क फार्मर असोसिएशनच्या धर्तीवर, राजहंस दूध संघाच्या मिशन ५० लिटर’ उत्पादनांतर्गत सोमवार दिनांक ३० मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता संगमनेर येथील ‘वसंत लॉन्स‘ येथे भव्य ‘राज्यस्तरीय दुग्ध उत्पादन परिषद’ आयोजित करण्यात आली आहे.

या परिषदेचे मुख्य आकर्षण म्हणजे संगमनेर तालुक्यातील सुमारे १५०० तरुण दूध उत्पादक शेतकरी आणि त्यांच्या पत्नी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दुग्ध व्यवसायात महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याने, पती-पत्नी दोघांनाही आधुनिक व्यवस्थापनाचे धडे मिळावेत, या उद्देशाने या परिषदेचे नियोजन करण्यात आले आहे.


पंजाब राज्याने दुग्ध उत्पादनात मोठी प्रगती केली आहे. त्याच धर्तीवर राजहंस दूध संघाने ‘मिशन ५० लिटर’ हे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. एका गायीचे सरासरी दूध उत्पादन वाढवून ते ५० लिटरपर्यंत कसे नेता येईल आणि त्यातून शेतकऱ्यांचा नफा कसा वाढवता येईल, याचे सखोल मार्गदर्शन या परिषदेत केले जाणार आहे.


या परिषदेसाठी महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्यासोबतच पंजाब मिल्क फार्मर असोसिएशनचे विविध पदाधिकारी, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख आणि दुग्ध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पंजाबमधील तज्ज्ञ पदाधिकारी यावेळी तेथील यशस्वी प्रयोगांची माहिती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देणार आहेत.

तरी तालुक्यातील आणि परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजहंस दूध संघाचे व्हाचेअरमन राजेंद्र चकोर , कार्यकारी संचालक डॉ सुजित खिलारी व संचालकांनी केले आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *