शिबलापूर । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र शिबलापूर येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांचा वार्षिक यात्रा उत्सव २०२६ येत्या मंगळवार, दिनांक ३१ मार्च आणि बुधवार, दिनांक १ एप्रिल रोजी अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. या दोन दिवसीय उत्सवात धार्मिक विधींसह मनोरंजन आणि खेळांच्या भव्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

पहिल्या दिवशी धार्मिक विधी आणि मनोरंजनाची मेजवानी
यात्रा उत्सवाच्या पहिल्या दिवशी, मंगळवारी (३१ मार्च) पहाटे ६ वाजल्यापासून कावड मिरवणूक व गंगा पाणी अभिषेकाने उत्सवाला सुरुवात होईल. दुपारी ४:३० वाजता श्री भैरवनाथ आणि जोगेश्वरी माता यांचा पारंपरिक ‘हळद सोहळा’ पार पडेल. सायंकाळी ६:३० ते रात्री ९ या वेळेत भव्य कला व छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. भक्तांच्या श्रद्धेचा परमोच्च बिंदू असलेला देवाचा ‘विवाह सोहळा’ आणि ‘महाआरती’ मंगळवारी मध्यरात्री १२ वाजता संपन्न होईल.

बैलगाडा शर्यत आणि लोकनाट्य तमाशाचे आकर्षण
यंदाच्या यात्रेचे खास आकर्षण म्हणजे मंगळवारी दुपारी ४ वाजता संगमनेर रस्ता, हॉटेल कैलास समोर भव्य ‘बैलगाडा शर्यतींचे’ आयोजन करण्यात आले आहे. या शर्यती पाहण्यासाठी तालुक्यातून मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच, रात्री ९ वाजता रसिकांच्या मनोरंजनासाठी निलेश कुमार अहिरेकर व रुपाली पुणेकर यांचा तुफान ‘लोकनाट्य तमाशा’ सादर होणार आहे.

दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा जंगी ‘हंगामा’

बुधवार, १ एप्रिल रोजी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नैवेद्य, तळी भरणे, पूजा व आरती असे धार्मिक विधी पार पडतील. दुपारी १२ वाजता भव्य महाआरती होईल. यात्रेची सांगता दुपारी ४ वाजता होणाऱ्या ‘कुस्त्यांच्या विराटाने’ (हंगामा) होणार आहे. यामध्ये अनेक नामांकित मल्ल आपले कसब पणाला लावणार आहेत.

या यात्रा उत्सवासाठी शिबलापूर ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीकडून जय्यत तयारी सुरू असून, परिसरातील सर्व भाविकांनी या उत्सवाचा आणि कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा कमिटीकडून करण्यात आले आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *