संतोष धसाळनंतर आरडगावचा अक्षय निकम पोलिसांच्या जाळ्यात!

 

झरेकाठी । झुंझार न्यूज

 


राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील दूध भेसळ प्रकरणाने आता मोठे वळण घेतले असून, स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) आपली कारवाई अधिक तीव्र केली आहे. मुख्य संशयित संतोष धसाळ याला अटक केल्यानंतर, आता त्याचा निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी अक्षय निकम (रा. आरडगाव) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे दूध भेसळ करणाऱ्या रॅकेटमध्ये मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


तांदुळवाडी येथील संतोष धसाळ याला त्याच्या राहत्या घरातून अटक केल्यानंतर, मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुन्हा त्याच्या घराची कसून झाडाझडती घेतली. या झडतीदरम्यान पोलिसांच्या हाती नेमके काय लागले, हे अद्याप गोपनीय ठेवण्यात आले असले, तरी या कारवाईनंतर लगेचच आरडगाव येथील अक्षय निकम या युवकाला ताब्यात घेण्यात आले. अक्षय निकम हा गेल्या अनेक वर्षांपासून संतोष धसाळ याच्याकडे कामाला होता. धसाळच्या घरातील दूध भेसळीच्या काळ्या धंद्यात अक्षयचा सक्रिय सहभाग असावा किंवा त्याने या कृत्यात मदत केली असावी, असा पोलिसांना दाट संशय आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, संतोष धसाळ याची काही वर्षांपूर्वीची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची होती. मात्र, अल्पावधीतच तो कोट्यधीश झाल्याने परिसरात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. दूध भेसळीच्या माध्यमातूनच त्याने ही माया जमवल्याची चर्चा आता उघडपणे होत आहे. विशेष म्हणजे, संतोष धसाळचे नेवासा फाटा येथील मोठ्या दूध भेसळखोरांशी घनिष्ठ संबंध असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण झाल्याचीही चर्चा असून, आता पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.


अक्षय निकमला ताब्यात घेतल्यामुळे दूध भेसळ प्रकरणातील अनेक छुपे पैलू समोर येण्याची शक्यता आहे. भेसळीसाठी वापरले जाणारे घातक रसायन कोठून येत होते? भेसळ केलेले दूध कुठे पुरवले जात होते? आणि या रॅकेटमध्ये आणखी किती बडे मासे सामील आहेत? याचा उलगडा आता निकमच्या चौकशीतून होऊ शकतो.

पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक


स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने आणि कर्तव्यदक्षपणे हाताळत आहे. दूध सारख्या जीवनावश्यक वस्तूमध्ये भेसळ करून लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जात असल्यामुळे नागरिकांमधून पोलिसांचे कौतुक होत आहे. अक्षय निकमच्या अटकेनंतर आता या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि इतर साथीदारांचे धाबे दणाणले आहेत.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *