राहुरी । झुंझार न्यूज

 


राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, दाखल झालेल्या ३० अर्जांपैकी ७ अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद ठरले आहेत, तर एका उमेदवाराने पहिल्याच दिवशी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत २२ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक असून, गुरुवारी (दि. ९) होणाऱ्या माघारीच्या अंतिम मुदतीनंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

यांचे अर्ज ठरले बाद


छाननी प्रक्रियेत उमेश महादेव म्हैत्रे, दत्तात्रय नारायण म्हैस, त्रिशला मिलिंद कांबळे, शिवाजी आनंदा कदम, नंदकुमार भागवत खेमनर, सोहम बापुसाहेब चिंधे आणि शोएब सुभेदार शेख या ७ जणांचे अर्ज बाद झाले आहेत. तर, प्रवीण सुभाष दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज पहिल्याच दिवशी मागे घेतला.

प्रमुख पक्षांची रणनीती आणि बंडखोरीचे सावट
भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर २३ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. भाजपने दिवंगत कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना रिंगणात उतरवून सहानुभूती आणि वारसा या दोन्ही जोरावर मोर्चेबांधणी केली आहे.

दुसरीकडे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माघार

घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा फेरबदल करत गोविंद मोकाटे या नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीनेही ऐनवेळी उमेदवार बदलून देवळाली प्रवराचे नगरसेवक संतोष चोळके यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

अस्मितेचा मुद्दा आणि अपक्ष उमेदवारांचे आव्हान


महाविकास आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असतानाच, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी अपक्ष अर्ज दाखल करून खळबळ उडवून दिली आहे. “प्राजक्त तनपुरे रिंगणात नसल्याने राहुरीच्या अस्मितेसाठी मी निवडणूक लढवणारच,” अशी भूमिका खेवरे यांनी मांडली आहे. त्यांच्यासोबतच शिंदे सेनेचे रवींद्र मोरे आणि सविता राजेंद्र शेटे यांनीही अपक्ष अर्ज दाखल केल्याने प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसमोर आव्हान उभे राहिले आहे.

गुरुवारी होणार अंतिम फैसला


सध्या २२ उमेदवार रिंगणात असले तरी, गुरुवारी (दि. ९) माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी पक्षाचे अधिकृत उमेदवार बंडखोरांना शांत करण्यात यशस्वी होतात की लढत बहुरंगी होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ९ तारखेला दुपारी ३ वाजेनंतरच राहुरी पोटनिवडणुकीचे अंतिम रणांगण कोणाकोणात असेल, हे स्पष्ट होईल.


राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *