राहुरी : झुंझार न्यूज
राहुरी विधानसभा मतदार संघाच्या आगामी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या निवडणुकीत आपली ताकद अजमावण्यासाठी आणि पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर उद्या (गुरुवारी) राहुरी दौऱ्यावर येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या दौऱ्यादरम्यान बाळासाहेब आंबेडकर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून, त्यानंतर एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत ते पोटनिवडणुकीबाबत पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राजकीय समीकरणे बदलणार?
राहुरी मतदार संघात सध्या विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीची भूमिका अत्यंत कळीची ठरणार आहे. बाळासाहेब आंबेडकर या निवडणुकीत कोणता नवा ‘फॉर्म्युला’ मांडतात किंवा कोणत्या मुद्द्यांवर भर देतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी या दौऱ्याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर स्वतः मैदानात उतरले असून, त्यांच्या उपस्थितीत होणारी पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची असेल. या परिषदेला सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे.”
