घोटाळ्याचे धागेदोरे जिल्हा परिषदेच्या ‘त्या’ इमारतीपर्यंत?

 

साडेतीन कोटींचा अपहार; ५६ कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले, बड्या अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता

अकोले । झुंझार न्यूज 

अकोले तालुक्यातील मवेशी, ब्राम्हणवाडा आणि शेंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये झालेल्या ३ कोटी ६४ लाख ५ हजार रुपयांच्या महाघोटाळ्याने जिल्हा प्रशासन हादरले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि गेली अनेक दिवस पोलिसांना हुलकावणी देणारा आरोपी मंदार पावडे याला अखेर राजूर पोलिसांनी अटक केली आहे. पावडेच्या अटकेमुळे आता या घोटाळ्याचे कनेक्शन थेट अहमदनगर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीपर्यंत पोहोचल्याची चर्चा सुरू झाली असून, यात अनेक ‘मोठे मासे’ अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अकोले पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आरोग्य केंद्रांमध्ये कोट्यवधींचा अपहार झाल्याचे उघड होऊनही मुख्य आरोपी मोकाट असल्याने अनेक वृत्तपत्राने वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल घेत राजूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि मुख्य आरोपी मंदार श्रावण पावडे याला बेड्या ठोकल्या.


असा झाला साडेतीन कोटींचा ‘डल्ला’

२०१७ ते २०२४ या सात वर्षांच्या कालावधीत हा अपहार झाला आहे. शासकीय निधीचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. या कागदपत्रांच्या आधारे शासनाची आर्थिक फसवणूक करण्यात आली. लेखा विभागाच्या चौकशी समितीने या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर ३ कोटी ६४ लाख ५ हजार ४०० रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शामकांत शेटे यांनी राजूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.


तपासाची सुई जिल्हा परिषदेकडे

मंदार पावडेच्या अटकेनंतर आता पोलीस चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपहाराचे धागेदोरे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग आणि अर्थ (लेखा) विभागापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणात तत्कालीन गटविकास अधिकारी (BDO), लेखाधिकारी, डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य सेवक अशा एकूण ५६ कर्मचाऱ्यांना आधीच नोटीस बजावण्यात आली आहे. पावडेच्या चौकशीतून या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग स्पष्ट झाल्यास जिल्हा परिषदेत मोठी खळबळ उडणार आहे.


इतर आरोपींची स्थिती काय?
१. मंदार पावडे: मुख्य आरोपी, राजूर पोलिसांच्या कोठडीत.
२. युवराज डगळे व बाळासाहेब लोंढे: यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
३. भिमाशंकर देशमुख: मवेशी आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहाय्यक; अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव.
४. संतोष घुले: जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी; सध्या निलंबित.

या घोटाळ्यात केवळ आरोग्य केंद्रातील कर्मचारीच नव्हे, तर जिल्हा स्तरावरील वित्त विभागाच्या आशिर्वादाने हा प्रकार सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. ५६ कर्मचाऱ्यांवर अपहाराचा ठपका ठेवण्यात आल्याने आरोग्य विभागात भीतीचे वातावरण आहे. आता पोलीस तपासात जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमधील कोणते ‘बडे अधिकारी’ आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *