बैलगाडा शर्यती, मर्दानी खेळ, आरोग्य शिबीर आणि प्रबोधनपर कीर्तनाची मेजवानी
जनमानसात उत्साहाचे वातावरण
आश्वी । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथे सामाजिक ऐक्य आणि प्रबोधनाचा वारसा जपत ‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले’ आणि ‘महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. संविधान चौकात होणाऱ्या या दोन दिवसीय सोहळ्यात क्रीडा, संस्कृती आणि समाजसेवेचा त्रिवेणी संगम पाहायला मिळणार असून, संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण आहे.
पहिल्या दिवशी रंगणार बैलगाडा शर्यती आणि कीर्तन
महोत्सवाचा प्रारंभ उद्या सोमवार, दि. १३ मे रोजी दुपारी भव्य ‘बैलगाडा शर्यतींनी’ होणार आहे. या चित्तथरारक शर्यतींमधील विजेत्यांना आयोजकांच्या वतीने आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यानंतर, सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचे प्रबोधनपर कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. या कीर्तनाच्या माध्यमातून महामानवांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. कार्यक्रमाच्या सांगतेनंतर उपस्थित भाविक व नागरिकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.
मुख्य दिवशी भव्य मिरवणूक आणि सांस्कृतिक सोहळा मंगळवारी, दि. १४ मे रोजी महोत्सवाचा मुख्य सोहळा पार पडणार आहे. सकाळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाईल, त्यानंतर नियोजित स्मारकाच्या ठिकाणी ध्वजारोहण संपन्न होईल.
दुपारच्या सत्रात सनई आणि हलगीच्या पारंपरिक निनादात भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘जाणता राजा प्रतिष्ठान’तर्फे सादर केले जाणारे मर्दानी खेळ आणि ‘फिनिक्स अकॅडमी’च्या खेळाडूंची मल्लखांबची थरारक प्रात्यक्षिके असतील. तसेच सटाणा येथील सुप्रसिद्ध ‘बागायतदार ब्रास बँड’च्या सुरावटींनी मिरवणुकीत रंगत येईल. विशेष आकर्षण म्हणून ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर करंडक नृत्य स्पर्धा २०२४’ चा कलाविष्कारही नागरिकांना अनुभवता येईल.
केवळ उत्सव साजरा न करता सामाजिक उत्तरदायित्व जपण्याच्या उद्देशाने या महोत्सवात ‘रक्तदान शिबीर’ आणि ‘सर्वरोग निदान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. तसेच, भावी पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजावी यासाठी शालेय विद्यार्थ्यांना ‘पुस्तक वाटप’ आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाची पूर्वतयारी म्हणून नुकत्याच ‘संघर्ष क्रिकेट क्लब’च्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडल्या आहेत.
या संयुक्त जयंती महोत्सवाच्या माध्यमातून शिबलापूरमध्ये विचारांची नवी पहाट निर्माण करण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे. या दोन दिवसीय सोहळ्यासाठी शिबलापूर व परिसरातील सर्व भीमसैनिक, आंबेडकरी अनुयायी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उत्सव समिती व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.