जलपुनर्भरणाबाबतही करण्यात आले प्रबोधन
संगमनेर । झुंझार न्यूज
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार सध्या राज्यभरात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा’ साजरा करण्यात येत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून संगमनेर येथील ऊर्ध्व प्रवरा धरण विभाग आणि त्यांतर्गत येणाऱ्या सर्व उपविभागांमध्ये ‘स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय’ हा उपक्रम अत्यंत उत्साहात राबविण्यात आला.
दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी ७:३० ते ९:३० या वेळेत हा स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला. यावेळी ऊर्ध्व प्रवरा धरण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री प्रदीप हापसे, श्री. प्रमोद माने आणि इतर सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी एकत्र येत कार्यालय आणि कार्यालयाच्या संपूर्ण परिसराची साफसफाई केली. साचलेला कचरा गोळा करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. या मोहिमेसाठी आवश्यक असलेल्या सर्व स्वच्छता साधनांचा पुरवठा विभागातर्फे करण्यात आला होता.
केवळ स्वच्छताच नव्हे तर भविष्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी ‘जल पुनर्भरण’ (Rain Water Harvesting) किती महत्त्वाचे आहे, यावरही यावेळी भर देण्यात आला. कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “पावसाचे पाणी जमिनीत जिरवणे ही काळाची गरज आहे. सरकारी कार्यालयांनी यामध्ये आदर्श घालून दिला पाहिजे.” त्यांनी जल पुनर्भरणाच्या विविध पद्धती आणि त्याचे फायदे यावर सविस्तर प्रकाश टाकला.

१५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित या जलव्यवस्थापन पंधरवड्यांतर्गत विविध कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. संगमनेर येथील या उपक्रमामुळे सरकारी कार्यालयाचा परिसर चकाचक झाला असून, कर्मचाऱ्यांमध्ये स्वच्छतेबाबत आणि जलसाक्षरतेबाबत नवी ऊर्जा पाहायला मिळाली.

या मोहिमेत ऊर्ध्व प्रवरा धरण विभागातील सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



