संगमनेर तालुक्यातील आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या आश्वी बुद्रुक परिसरात बिबट्याने पुन्हा एकदा आपली दहशत निर्माण केली आहे. आज शुक्रवारी सकाळी शेतात घास कापणाऱ्या एका ५५ वर्षीय महिलेवर बिबट्याने अचानक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. या वस्तीवर बिबट्याचा हा चौथा हल्ला असून, वनविभागाच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आश्वी बुद्रुक येथील खेमनर वस्तीवरील गट नं. २३१ मध्ये सुमनबाई बाळासाहेब खेमनर (वय ५५) या महिला आज शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास आपल्या शेतात जनावरांसाठी घास कापत होत्या. यावेळी शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. बिबट्याने त्यांच्या हातावर आणि मानेवर खोलवर जखमा केल्या आहेत.
बिबट्याने हल्ला करताच सुमनबाई यांनी मोठ्याने आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून मुलगा सुभाष खेमनर आणि परिसरातील शेतकऱ्यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. मोठ्या संख्येने लोक येत असल्याचे पाहून बिबट्याने तिथून पळ काढला. ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुमनबाई यांचे प्राण वाचले असून पुढील मोठा अनर्थ टळला आहे. जखमी सुमनबाई यांना तातडीने उपचारासाठी लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
आश्वी आणि शिबलापूर परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या एकाच वस्तीवरील हा चौथा हल्ला आहे. कालच ( गुरुवारी ) शिबलापूर-आश्वी खुर्द रस्त्यावरील बोंद्रे वस्तीवर बिबट्याने ११ शेळ्यांचा फडशा पाडला होता. विशेष म्हणजे, तिथे वनविभागाचे कर्मचारी पिंजरा लावत असताना त्यांना दोन बिबट्यांमध्ये शिकारीवरून झुंज सुरू असल्याचे दिसून आले होते.
एकीकडे शेतात काम करणे जिवावर बेतत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दिवसाढवळ्या होणाऱ्या या हल्ल्यांमुळे आश्वी आणि शिबलापूर परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. वनविभागाने या नरभक्षक बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा आणि परिसरात ठिकठिकाणी पिंजरे लावावेत, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.