{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

क्रीडा, संस्कृती आणि समाजसेवेचा त्रिवेणी संगम; भीममय वातावरणात निघाली भव्य मिरवणूक

संगमनेर । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथे सामाजिक ऐक्य आणि प्रबोधनाचा वारसा जपत ‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले’ आणि ‘महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे अत्यंत भव्य आणि शिस्तबद्ध आयोजन करण्यात आले होते. स्थानिक संविधान चौकात दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात क्रीडा, संस्कृती आणि समाजसेवेचा त्रिवेणी संगम पाहायला मिळाला, ज्यामुळे संपूर्ण परिसर भीममय झाला होता.

महोत्सवाची सुरुवात सोमवार, दि. १३ मे रोजी दुपारी ४ वाजता भव्य ‘बैलगाडा शर्यतींनी’ झाली. या शर्यतींमध्ये अकोले, सिन्नर, राहुरी यांसह परिसरातील अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत चित्तथरारक ठरलेल्या या शर्यतींमधील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके व बक्षिसे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

सोमवारी सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज वाबळे यांचे प्रबोधनपर कीर्तन संपन्न झाले. आपल्या निरुपणातून महाराजांनी गौतम बुद्धांच्या कार्याचा गौरव केला. “बुद्ध म्हणजेच विठ्ठल-रुक्मिणी होय,” असे सांगत त्यांनी महामानवांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवले. कीर्तनानंतर उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

मंगळवारी, दि. १४ मे रोजी सकाळी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली. प्रारंभी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यानंतर स्मारक स्थळी मान्यवरांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले.

राजेशाही थाटात निघाली भव्य मिरवणूक

मंगळवारी सायंकाळी सनई आणि हलगीच्या पारंपरिक निनादात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘जाणता राजा प्रतिष्ठान’तर्फे सादर करण्यात आलेले मर्दानी खेळ. यात केवळ तरुणच नव्हे, तर मुलींनीही आपल्या साहसी कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. सटाणा येथील सुप्रसिद्ध ‘बागायतदार ब्रास बँड’च्या सुरावटींनी मिरवणुकीत अधिक रंगत आणली. विशेष आकर्षण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा जुन्या राजेशाही थाटातील गाडीतून (रथातून) विराजमान करण्यात आली होती.

केवळ उत्सव साजरा न करता सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने या महोत्सवात विविध आरोग्य व शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आले. मालपाणी रक्त केंद्राच्या माध्यमातून ‘रक्तदान शिबिर’ आणि सिध्दकला हॉस्पीटलमार्फत ‘सर्वरोग निदान शिबिराचे’ यशस्वी आयोजन करण्यात आले. तसेच, भावी पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजावी या उद्देशाने शालेय विद्यार्थ्यांना ‘पुस्तक वाटप’ करण्यात आले.

महोत्सवाची पूर्वतयारी म्हणून ‘संघर्ष क्रिकेट क्लब’च्या वतीने आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाही यशस्वीरीत्या पार पडल्या.

परिसरातील गावांमध्येही जल्लोष

शिबलापूरसह परिसरातील पानोडी, आश्वी, उंबरी बाळापूर, शेडगांव, मालुंजे, पिंप्री लौकी, अजमपूर, खळी, दाढ खुर्द, झरेकाठी आदी ग्रामपंचायतींमध्येही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गावपातळीवर तरुणांनी मिरवणुका काढून मोठा जल्लोष केला.

या संयुक्त जयंती महोत्सवाच्या माध्यमातून शिबलापूरमध्ये विचारांची नवी पहाट निर्माण करण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला. या दोन दिवसीय सोहळ्यासाठी शिबलापूर व परिसरातील भीमसैनिक, आंबेडकरी अनुयायी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल तरुण कार्यकर्त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *