आश्वी । झुंझार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदार संघातील शिबलापूर परिसरात बिबट्याने मोठा धुमाकूळ घातला आहे. शिबलापूर-आश्वी रस्त्यावरील बोंद्रे वस्ती येथे राहणाऱ्या ६२ वर्षीय वृद्ध महिला लहानबाई मच्छिद्र वनवे यांच्या गोठ्यावर बिबट्याने मध्यरात्री भीषण हल्ला केला. या हल्ल्यात १० शेळ्या आणि १ बोकड अशा एकूण ११ प्राण्यांचा जागीच मृत्यू झाला असून, यामुळे या गरीब कुटुंबाचे सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, लहानबाई वनवे यांनी आपल्या घरामागे १० बाय १५ आकाराच्या पत्र्याच्या गोठ्यात १० शेळ्या, १ बोकड आणि ३ छोटी कोकरे (पाठी) बांधली होती. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने गोठ्याच्या पाठीमागून असलेल्या एका अरुंद फटीतून आत प्रवेश केला. गोठा सर्व बाजूंनी बंदिस्त असल्याने बिबट्याला बाहेर पडायला जागा मिळाली नाही. शिकार करण्याच्या नादात बिबट्याने पिसाळल्यासारखा एकामागून एक सर्व १४ प्राण्यांवर हल्ला चढवला. या थरारक हल्ल्यात बिबट्याने ११ प्राण्यांच्या मानेचा घोट घेतला, तर ३ छोटी कोकरे सुदैवाने या हल्ल्यातून वाचली आहेत. हल्ल्यानंतर बिबट्याने ५ शेळ्या ओढत नेऊन जवळच ५० फुटांवर असलेल्या ऊसाच्या शेतात नेल्या.

 

 

वृद्ध महिलेचे कष्ट मातीला; ‘दुष्काळात तेरावा महिना

 

बाधित महिला लहानबाई वनवे या वयोवृद्ध असून त्यांना स्वतःची शेती नाही. शेजारी-पाजाऱ्यांकडून गवत आणि चारा आणून त्या मोठ्या कष्टाने शेळ्यांचे पालनपोषण करत होत्या. आपला उदरनिर्वाह याच शेळ्यांवर अवलंबून असल्याने त्यांनी काटकसर करून हा गोठा जतन केला होता. सध्या बाजारात एका शेळीची किंमत २० ते २५ हजार रुपये असताना, एकाच रात्रीत अडीच ते तीन लाख रुपयांचे भांडवल बिबट्याने नष्ट केल्याने त्यांच्यावर आभाळ कोसळले आहे. “दुष्काळात तेरावा महिना” अशी त्यांची अवस्था झाली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच सरपंच प्रमोद बोंद्रे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शिंदे आणि गावातील तरुणांनी ऊसाच्या शेतात शोधमोहीम राबवली. यावेळी त्यांना ऊसात बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले. बिबट्या समोर दिसल्याने भीतीपोटी ग्रामस्थ पुन्हा घराजवळ आले. यानंतर वनपाल सुजीत बोकडे, वनकर्मचारी सूळ, गागरे आणि शेख यांना तातडीने फोनवरून माहिती देण्यात आली. कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असले, तरी वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना येण्यास विलंब झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 

एकाच रात्रीत इतक्या मोठ्या प्रमाणात शिकार झाल्याने बिबट्या याच परिसरात दबा धरून बसला असण्याची शक्यता आहे. यामुळे परिसरात भीतीचे सावट पसरले असून शेतकरी आणि ग्रामस्थ दहशतीखाली आहेत. संबंधित बिबट्याला तातडीने पिंजरा लावून जेरबंद करावे, अशी मागणी सरपंच प्रमोद बोंद्रे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शिंदे, दूध संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब बोंद्रे, एकनाथ नागरे, जालिंदर बोंद्रे यांसह ग्रामस्थांनी केली आहे.

 

मंत्री पंकजाताई मुंडे यांनी नुकतेच आपल्या पशुसंवर्धन विभागामार्फत गोरगरिबाच्या उदर निर्वाहाकरिता शेळी पालन योजना सुरू केल्याने नुकसानग्रस्त लहानबाई वनवे या वृयोवृध्द महिलेला तातडीने ही योजना मंजूर करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे .

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *