पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनगाथेतून इतिहास, संस्कृती आणि सामाजिक संदेशाचे प्रभावी दर्शन

 

 

झरेकाठी । झुंझार न्यूज

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने पाथरे केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या प्रवरा सांस्कृतिक महोत्सवात ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जीवनगाथा’ हे मध्यवर्ती आशयसूत्र ठेवून कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले होते. या सांस्कृतिक महोत्सवाच्या पंचक्रोशीतील सहा विविध संस्थांच्या १७ शाळा व महाविद्यालयातील नवोदित कलाकार विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वैविध्यपूर्ण पारंपरिक भारतीय लोककलांचे संवर्धन करत सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रभावी सादरीकरण केले.


सन्मा. नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील साहेब, मंत्री, जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळ) महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री, अहिल्यानगर तथा चेअरमन लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरानगर यांच्या संकल्पनेतून साकारलेला व भाजप महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मा. खा. डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाथरे पंचक्रोशी केंद्रात प्रवरा सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश पूजन, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. याप्रसंगी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे, शिक्षण विभागाच्या संचालिका सौ. लीलावती सरोदे, ॲड. बाळकृष्ण चोरमुंगे पाटील, आबासाहेब घोलप, , रमेश पन्हाळे, सरपंच उमेश घोलप, अशोक घोलप, पोपटराव वाणी, पत्रकार सोमनाथ डोळे, . यमन पुलाटे तसेच पंचक्रोशीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ ग्रामस्थ यांच्या शुभहस्ते व्यासपीठाचे पूजन झाले. श्रीगणेश आरती आणि महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.


याप्रसंगी मार्गदर्शन करताना संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील म्हणाल्या की,” प्रवरा सांस्कृतिक महोत्सव हा विद्यार्थी केंद्रित उपक्रम आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त क्षमतांचा तसेच त्यांच्यामधील नवोदित कलाकारांना जागृत करणारे हे सांस्कृतिक व्यासपीठ आहे. लोकरंगभूमीवरील सर्व लोककथागीते, लोकगीत, लोकनाट्य, विधीनाट्य विद्यार्थ्यांनी धाडसाने सादर केली. सादरीकरणामध्ये विद्यार्थ्यांनी रेकॉर्डिंग तंत्रज्ञानाला बाजूला सारून सभाधिटपणे मौखिक माध्यमातून प्रगटीकरण केले, हे कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि खूप आत्मविश्वास दिसला, हे पाहून मला आनंद वाटला.”महोत्सवात ‘अहिल्याबाई होळकर जीवनप्रवास गीत किंवा नाटिका’, ‘नो ड्रग्स नाटिका’, ‘भजन व पोवाडा’, ‘छत्रपती संभाजी महाराज : शौर्यगीत किंवा नाटिका’, ‘अहिल्यानगर शहराचा इतिहास’ आणि ‘महाराष्ट्रातील सण-उत्सव’ या विविध आशयांवर आधारित कार्यक्रम सादर करण्यात आले.


या सांस्कृतिक उपक्रमात एकूण ४१८ नवोदित विद्यार्थी कलाकारांनी सहभाग घेतला. त्यामध्ये २७७ मुली आणि १४१ मुले सहभागी होते. बालविद्यार्थ्यांपासून युवक-युवतींपर्यंत विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी नाटिका, कथागीत, गीत, पोवाडा, भजन आदी कलाप्रकारांतून आपल्या कलागुणांचे उत्स्फूर्त दर्शन घडविले.


पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित थीम सादर करताना कार्यक्रम स्थळी १८ व्या शतकातील वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. तत्कालीन जीवनपध्दती, तांब्या व पितळेचे भांडी, दुर्मिळ दिवे, मोडिलिपीतील अस्सल कागदपत्रे आदींचे प्रदर्शन भरवले होते. या ऐतिहासिक वस्तू कला प्रदर्शनाचे परिसरातून अनेकांनी भेट देऊन कौतुक केले.


विविध गुणदर्शन स्पर्धेतील प्रवरा इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएससी पॅटर्न), सात्रळ या नव्याने सुरू झालेल्या शाळेने सादर केलेल्या ‘अहिल्यादेवी होळकर जीवनप्रवास’ या नृत्यनाट्यगीत सादरीकरणास प्राथमिक स्तरावरील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. माध्यमिक स्तरावरील प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्रगती माध्यमिक विद्यालय, कानडगाव यांना सादर केलेल्या सामूहिक भजन गायनास प्राप्त झाले. तर विशेष नैपुण्य पारितोषिक ‘मी तुकाराम बोलतोय…’ या एकपात्री नाटिका सादर करणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इरिगेशन बंगला, सात्रळ त्यांना प्राप्त झाले. श्री. राजेश माघाडे, डॉ. प्रवीण तुपे यांनी परीक्षण केले.


पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनातील कर्तृत्व, संघर्ष, न्यायप्रियता, लोककल्याणकारी कार्य आणि समाजाभिमुख विचार विद्यार्थ्यांनी कलात्मक पद्धतीने मांडले. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास, अहिल्यानगर शहराची ऐतिहासिक वाटचाल, महाराष्ट्रातील सण-उत्सवांची परंपरा आणि अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यसनमुक्तीचा सामाजिक संदेश या विषयांनाही विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे स्पर्श केला.


विशेष म्हणजे, केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता या कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या इतिहासविषयक जाणिवा आणि अभिमान, सांस्कृतिक भान, सामाजिक संवेदनशीलता, सर्जनशीलता, संघभावना आणि रंगमंचीय आत्मविश्वास यांना चालना मिळाली. बालविद्यार्थी ते युवक-युवती अशा विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी अत्यंत आनंदाने, उत्साहाने आणि आत्मविश्वासाने केलेल्या नाट्यकथागीत व सांस्कृतिक सादरीकरणामुळे संपूर्ण परिसरात चैतन्यपूर्ण आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले. नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच इतिहास, संस्कृती आणि सामाजिक मूल्यांशी विद्यार्थ्यांची नाळ जोडण्याचे कार्य या महोत्सवातून झाले. इतिहासाच्या प्रेरणेतून संस्कृतीची जपणूक आणि नव्या पिढीच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा प्रवरा सांस्कृतिक महोत्सव विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संस्मरणीय ठरला.

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, पाथरे बु. केंद्राचे मुख्य समन्वयक प्राचार्य श्री. कोंडीबा बारगुजे, सात्रळ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सोपान शिंगोटे, प्रा. डॉ. नवनाथ शिंदे, प्राध्यापिका नूतन जोंधळे,प्रीती झोटिंग,वनिता नाईकवाडी, सुवर्णा घोलप, अनिता नळे, तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, प्रशासकीय कर्मचारी, सर्व समिती समन्वयक, सेवक वृंद आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप खूप परिश्रम घेतले. प्रवरा सांस्कृतिक महोत्सवाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. नवनाथ शिंदे व श्री. राधाकृष्ण कोराळे यांनी केले. आभार उपप्राचार्य श्री. ज्ञानेश्वर अनारसे यांनी मानले.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *