झरेकाठी । झुंझार न्यूज

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या सूर्याचा पारा चाळीशी पार गेला असून, वाढत्या उष्णतेच्या लाटेने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या वाढत्या उष्म्याचा फटका आता लहान मुलांना बसू लागला असून, राहुरी तालुक्यातील सोनगाव येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील दीड वर्षीय चिमुरडीचा उष्माघाताने मृत्यू झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

तन्वी योगेश शिंदे (वय १.५ वर्षे) असे या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. सोनगाव येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश रमेश शिंदे यांची ती कन्या होती.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून तन्वीला वाढत्या उष्णतेमुळे त्रास जाणवू लागला होता. उष्माघाताची लक्षणे दिसू लागल्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ तिला सोनगाव-कोल्हार परिसरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तिची प्रकृती अधिकच खालावल्याने डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. लोणी येथे तन्वीवर शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.

अवघ्या दीड वर्षांच्या तन्वीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोनगाव परिसरात या घटनेनंतर शोककळा पसरली असून, उष्माघाताच्या भीषणतेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


उष्णतेची लाट पाहता लहान मुले आणि वृद्धांची विशेष काळजी घेणे गरजेचे झाले आहे. या घटनेनंतर तन्वीचे वडील योगेश शिंदे आणि सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब म्हस्के यांनी नागरिकांना कळकळीचे आवाहन केले आहे. “वाढत्या तापमानामुळे लहान मुलांना दुपारच्या वेळी घराबाहेर काढू नका. त्यांना जास्तीत जास्त पाणी आणि द्रव पदार्थ द्या. उष्माघाताची कोणतीही लक्षणे दिसल्यास घरगुती उपचार न करता तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या, जेणेकरून कोणत्याही कुटुंबावर असा प्रसंग ओढवणार नाही,” असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

महाराष्ट्रात वाढत असलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानेही नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, सोनगावमधील या घटनेने उष्माघाताचा धोका किती गंभीर असू शकतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *