विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
आश्वी । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील पानोडी येथे ग्रामदैवत शंकराचार्य जयंतीच्या निमित्ताने दोन दिवसीय भव्य ‘महादेव यात्रा’ उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. २१ एप्रिल आणि बुधवार दि. २२ एप्रिल २०२६ या कालावधीत हा उत्सव संपन्न होणार असल्याची माहिती यात्रा कमिटीच्या आयोजकांनी दिली आहे.
.

धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
यात्रेच्या पहिल्या दिवशी, मंगळवारी सकाळी ८ वाजता महादेव मंदिरामध्ये विधिवत अभिषेक करण्यात येईल. त्यानंतर सकाळी ९ ते १२ या वेळेत भजनांच्या सुरांनी परिसर मंत्रमुग्ध होईल. सायंकाळी ६ ते ९ या वेळेत भव्य ‘कावड मिरवणूक’ काढण्यात येणार असून, यावेळी फटाक्यांची मोठी आतषबाजी हे आकर्षणाचे केंद्र ठरेल.

रिल स्टार पोर्णिमा पाटील यांचा तमाशा
युवा पिढीचे विशेष आकर्षण आणि महाराष्ट्राची महागायिका, सौंदर्य तारका तसेच प्रसिद्ध ‘रील स्टार’ पोर्णिमा पाटील यांचा लोकनाट्य तमाशा मंगळवारी रात्री ९ ते १२ या वेळेत होणार आहे. या कार्यक्रमामुळे पंचक्रोशीतील रसिक प्रेक्षकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

यात्रेच्या दुसऱ्या दिवशी, बुधवारी सकाळी ९ वाजता पारंपरिक ‘हजेरी’चा कार्यक्रम पार पडेल. त्यानंतर दुपारी ४ वाजता कुस्त्यांचा भव्य ‘हगामा’ आयोजित करण्यात आला आहे. या आखाड्यात नावजलेले मल्ल आपले कसब दाखवणार आहेत.

मंदिर रंगरंगोटी आणि भाविकांना आवाहन
यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावातील महादेव मंदिर आणि हनुमान मंदिराच्या रंगरंगोटीचे काम सध्या वेगाने सुरू आहे. उत्सवाच्या यशस्वीतेसाठी आणि मंदिराच्या देखभालीसाठी गावातील ग्रामस्थांनी व भाविकांनी सढळ हाताने वर्गणी जमा करावी, असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

यात्रेच्या निमित्ताने गावात विविध प्रकारचे पाळणे, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि खेळण्यांची दुकाने थाटली जाणार असून, संपूर्ण पानोडी गाव या उत्सवासाठी सज्ज झाले आहे. परिसरातील भाविकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
.

