“शिवसेना पदाधिकाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही”; संगमनेर बैठकीत संघटन बांधणीसह एमआयडीसी, शक्ती कायदा व कायदा-सुव्यवस्थेवर भाष्य
संगमनेर | झुंझार न्यूज
शासकीय समित्यांमध्ये ठरल्याप्रमाणे शिवसेनेला प्राधान्य मिळाले पाहिजे. यासंदर्भात आपण पालकमंत्र्यांशी चर्चा करणार असून, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही, असा विश्वास अहिल्यानगरचे संपर्कप्रमुख तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिला.

नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांच्या संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर मंत्री उदय सामंत हे प्रथमच संगमनेर येथे शिवसेना महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित बैठकीसाठी आले होते. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी त्यांचे स्वागत केले.
बैठकीस माजी खासदार सदाशिव लोखंडे, शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, प्रवक्ते संजीव भोर, युवासेना जिल्हाप्रमुख शुभम वाघ, जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, उपजिल्हाप्रमुख मारुती मेंगाळ, जगन देशमुख, रमेश काळे, रणजित ढेरंगे, तुषार गजे, ज्येष्ठ नेते संतोष रोहम, तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे, राजेंद्र सोनवणे, तालुका संघटक मंजाबापू साळवे, विनोद सूर्यवंशी, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, महिला उपजिल्हाप्रमुख दिपाली वाव्हळ, युवासेना उपजिल्हाप्रमुख सौरभ देशमुख, तालुकाप्रमुख सुशील शेवाळे, शहरप्रमुख सार्थक शेवाळे यांच्यासह शिवसेना महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री सामंत म्हणाले की, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर नाशिक व अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर आता अहिल्यानगर जिल्ह्यात आलो आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला जाणार असून, शिवसेना, महिला सेना, युवासेना आदी सर्व विभागांमध्ये गटप्रमुखापासून जिल्हाप्रमुखांपर्यंतची सर्व पदे भरलेली असावीत, यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
.
अहिल्यानगरमधील दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना पक्ष अधिक मजबूत व्हावा, यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योग विभाग हा औद्योगिक वसाहतींच्या माध्यमातून स्वतःचा निधी उभा करत असतो. त्यामुळे उद्योग विभागाला वेगळ्या निधीची आवश्यकता भासत नाही. एमआयडीसी मंजूर झाली असून, पुढील दोन महिन्यांत त्या संदर्भातील प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा निषेध करताना मंत्री सामंत म्हणाले की, अशी कृत्ये करणारी प्रवृत्ती अत्यंत नीच असून, पोलीस प्रशासनाने अशा प्रवृत्तीला कायमचा आळा घातला पाहिजे. भविष्यात जिल्ह्यात, राज्यातच नव्हे तर देशात कुणीही अशा प्रकारचे कृत्य करण्याचे धाडस करू नये, यासाठी अत्यंत कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासन कायद्याची अंमलबजावणी करत असले तरी आणखी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“शिवसेना ‘शक्ती कायद्याच्या’ विरोधात नसून, हा कायदा राज्यात प्रभावीपणे लागू झाला पाहिजे, या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि आम्ही सर्वजण हा कायदा लवकरात लवकर लागू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहोत. महिलांवरील अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी केवळ कायदे असून चालणार नाही, तर त्यांची कठोर अंमलबजावणी होणेही तितकेच आवश्यक आहे. महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत सरकार कोणतीही तडजोड करणार नाही.”
— उदय सामंत, उद्योगमंत्री
……………………………………..




