ग्रामस्थांशी संवाद साधून दिला दिलासा,सरकार तुमच्या पाठीशी !

 

 

 

आश्वी । झुंझार न्यूज

 

मागील काही दिवसांपासून आश्वी परिसरात चोरांनी निर्माण केलेली दहशत , चोरीच्या घटनांची वाढती संख्या ड्रोनच्या माध्यमातून समाजिक वातावरण भयग्रस्त करण्याच्या प्रयत्नाना असलेल्या दहशतीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करावे,पोलीस प्रशासनाला सर्वतोपरी सूचना देण्यात आल्या आहेत.सरकार ग्रामस्थांच्या बरोबर आहे.गावातील भीतीचे वातावरण दूर करा. युवकाचे ग्रामसुरक्षा दल आणि लोकसहभागातून संघटीत गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्यात यश येईल असा विश्वास जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

आश्वी बुद्रुक व आश्वी खुर्द येथे अलीकडे घडलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर परिसरातील विविध गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील यांनी गावात येवून प्रमुख कार्यकर्ते ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधून दिलासा दिला. बैठकीला संगमनेरचे पोलिस उपअधीक्षक कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे किरणकुमार कबाडी, मांची हिल उद्योग समूहाचे संस्थापक शालिग्राम होळकर, मच्छिंद्र पाटील थेटे, रामभाऊ पाटील भुसाळ, कैलास नाना तांबे, भारतराव गीते , भगवानराव इलग , सरुनाथ उंबरकर , सतिषराव जोशी , बन्सी तांबे, भाऊ पाटील गायकवाड, मकरंद गुणे, बापूसाहेब गायकवाड, रोहिणीताई निघुते, अनिल भोसले , अनिल म्हसे , अशोक जऱ्हाड आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ग्रामस्थांनी गावातील मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, रात्रीचे भारनियमन बंद करणे तसेच पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशा मागण्या मांडल्या. त्यावर बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, पोलीस यंत्रणेची स्वतंत्र बैठक घेऊन या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अफवांवर विश्वास न ठेवता युवकांनी ग्रामसुरक्षा दल स्थापन करून रात्री आठ नंतर गावात येणाऱ्या वाहनांची चौकशी करावी तसेच गावात नव्याने आलेल्या परप्रांतीय रहिवाशांची माहिती पोलीस प्रशासनाला द्यावी.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरू नयेत यासाठीही नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रवरा उजवा व डावा कालवा परिसरात दुपारच्या आणि रात्रीच्या वेळी आढळणाऱ्या संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवण्यासाठी जलसंपदा विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्र पथक स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

परिसरातील अवैध धंदे आणि वाळू उपशावरही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मंत्री विखे पाटील यांनी दिला.“गाव सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनासोबत ग्रामस्थांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. ग्रामसुरक्षा दल आणि संदेश प्रणालीच्या माध्यमातून गावांमध्ये सतर्कता वाढवावी,” असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed