लोणी येथे महावितरणची विशेष आढावा बैठक; पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे आदेश

आश्वी । झुंझार न्यूज

राज्यातील महायुती सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र भारनियमनमुक्त करण्यासाठी कटिबद्ध आहे. या पार्श्वभूमीवर, स्थानिक पातळीवर महावितरणने आपले नियोजन सुधारून शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा कसा करता येईल, याचा ठोस कृती आराखडा तातडीने तयार करावा, असे स्पष्ट निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील महावितरणच्या विविध समस्या आणि उपाययोजनांबाबत लोणी येथे एका विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आणि अभियंते उपस्थित होते.

बैठकीत बोलताना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, “वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. महावितरणने आता अधिक पारदर्शकतेने आणि लोकाभिमुख होऊन काम करण्याची गरज आहे. विशेषतः ग्रामीण भागात संध्याकाळच्या वेळी होणारे भारनियमन कमी करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांना शेतीकामासाठी रात्रीच्या वेळी जावे लागते, ज्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो. हा धोका टाळण्यासाठी त्यांना दिवसा वीज मिळणे आवश्यक आहे.

महायुती सरकारने सौर ऊर्जेसाठी स्वतंत्र धोरण आखले आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती करावी. सौर पंप बसवताना शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे आर्थिक फसवणूक होणार नाही, याची दक्षता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच, ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या पाझर तलावांवर सौर पंप उभारण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.


पावसाळ्यात वादळ-वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते. हे टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वीच वाकलेले पोल, मोडलेले खांब दुरुस्त करावेत आणि वीजवाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तातडीने छाटाव्यात. “पावसाळ्यात नागरिकांना अंधारात राहावे लागणार नाही, याची जबाबदारी महावितरणची आहे,” असेही मंत्र्यांनी ठणकावून सांगितले.

परिसरात वाढत असलेल्या चोरीच्या घटना आणि गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. रात्रीच्या वेळी वीज नसल्याचा फायदा गुन्हेगार घेतात, त्यामुळे रात्रीचे भारनियमन टाळण्यासाठी विशेष नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.


महावितरणने आपल्या सेवांमध्ये आधुनिकता आणावी. नियोजित वीजपुरवठा खंडित होणार असल्यास किंवा नवीन योजनांची माहिती असल्यास ती सोशल मीडियाच्या माध्यमातून (WhatsApp, Facebook) ग्राहकांपर्यंत त्वरित पोहोचवावी. ग्राहकांशी संवाद वाढवून तक्रारींचे निवारण जलद गतीने करावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

या बैठकीस महावितरणचे कार्यकारी अभियंता पी. आर. वटमवार, उपकार्यकारी अभियंता डी. डी. पाटील, सहाय्यक अभियंता के. एस. खरगे, के. एन. दंडवते, श्री. जाधव, डी. एस. मुळे, रोहित तायडे, पी. डी. परदेशी यांच्यासह विविध उपविभागांचे कनिष्ठ अभियंते, कर्मचारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed