आश्वी । झुंझार न्यूज

गेल्या काही दिवसांपासून राहुरी, राहाता, संगमनेर आणि श्रीरामपूर तालुक्यासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, महसूल, पशुसंवर्धन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलीस प्रशासनाची तातडीची बैठक घेत, गुन्हेगारांचा आणि अवैध धंदेवाइंकांचा कोणाचेही पाठबळ असले तरी कडक बंदोबस्त करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी ड्रोन फिरवून दहशत निर्माण करण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारांमुळे जनजीवन भयग्रस्त झाले असून, मंत्र्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “ड्रोन फिरवण्यामागे नक्की कोणाचा हात आहे, याचा शोध घेण्यासाठी वन विभागाच्या अत्याधुनिक यंत्रणेची मदत घ्या. तसेच, रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवा. जर पोलीस संख्याबळ कमी पडत असेल, तर तातडीने जादा कुमक मागवून घ्या, पण जनतेला सुरक्षितता जाणवली पाहिजे,” असे विखे पाटील यांनी बजावले.

पोलीस प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक गावात स्थानिक तरुणांना विश्वासात घेऊन ‘ग्राम सुरक्षा दल’ स्थापन करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले आहेत. या माध्यमातून गावातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होईल आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे सोपे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर भाष्य करताना मंत्री विखे पाटील यांनी पोलिसांना मोकळी सूट दिली आहे. “अवैध व्यवसाय करणारे किंवा गुन्हेगार कोणत्याही पक्षाचे असोत किंवा त्यांना कोणाचेही राजकीय पाठबळ असो, त्यांच्यावर कारवाई करताना मागे-पुढे पाहू नका. रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारी हॉटेल्स, पान टपऱ्या आणि ढाबे यांच्यावर विशेष पथकांमार्फत कारवाई करा,” असे आदेश त्यांनी दिले.


जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे आणि नवीन वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. “सुरक्षेसाठी आणखी निधी हवा असल्यास शासन तो द्यायला तयार आहे, मात्र पोलिसांचे यश चव्हाट्यावर येण्याऐवजी जनतेतील भीतीचे वातावरण दूर होणे गरजेचे आहे,” असेही मंत्र्यांनी नमूद केले.


दरम्यान, जिल्ह्यात गर्भलिंग तपासणीचे मोठे रॅकेट उघड केल्याबद्दल त्यांनी पोलीस पथकाचे अभिनंदन केले. मात्र, असे रॅकेट जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढणार नाही याची काळजी घ्या आणि या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारांना कठोर शिक्षा होईल अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed