अहिल्यानगर । झुंझार न्यूज
नाशिकमधील खरात प्रकरण अद्याप शांत होत नाही तोच, आता अहमदनगरचे खासदार निलेश लंके एका नवीन वादात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कथित भोंदूबाबा नानासाहेब विरकर उर्फ ‘गुरु माऊली महाराज’ याला पोलिसांनी अटक केल्यानंतर, त्याचे खासदार निलेश लंके आणि त्यांच्या पत्नी राणी लंके यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोंमुळे राजकीय वर्तुळात आणि समाजमाध्यमांवर एकच खळबळ उडाली आहे.
माढा तालुक्यातील आहेगाव येथे नानासाहेब विरकर हा स्वतःच्या पाच एकर जागेत एक हायटेक ‘एसी’ दरबार भरवत होता. या दरबारात येणाऱ्या भक्तांना तो त्यांच्या बँक खात्याचा क्रमांक आणि खात्यात असलेली शिल्लक रक्कम अचूक सांगत असल्याचा दावा करत असे. या चमत्कारिक दाव्यांना भुलून अनेक भाविक त्याच्या जाळ्यात ओढले जात होते. मात्र, अंधश्रद्धा निर्मूलन आणि तक्रारींनंतर पोलिसांनी कारवाई करत नानासाहेब विरकर आणि त्याच्या भावाला भोंदूगिरी, फसवणूक आणि आर्थिक लुबाडणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे.
विरकरला अटक होताच सोशल मीडियावर खासदार निलेश लंके यांचे काही जुने फोटो आणि पोस्ट वेगाने पसरू लागल्या आहेत .
१. खासदार निलेश लंके हे या भोंदूबाबाच्या पायावर डोकं ठेवून आशीर्वाद घेताना दिसत आहेत.
२. एका कार्यक्रमात लंके यांनी विरकरला सन्मानपूर्वक शाल अर्पण केली आहे.
३. निलेश लंके यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून “करेक्ट नियोजन, परफेक्ट कार्यक्रम” अशा कॅप्शनसह गुरुमाऊलीचा आशीर्वाद घेतल्याचा उल्लेख असलेली जुनी पोस्टही समोर आली आहे.
४. राणी लंके जिल्हा परिषद सदस्य असताना विरकरच्या भक्त परिवाराने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचाही एक फोटो व्हायरल झाला आहे.





