शिर्डी । झुंझार न्यूज

भारताचे केंद्रीय संरक्षण मंत्री मा. ना. श्री. राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आज शिर्डी येथे जाऊन श्री साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान त्यांनी देशाच्या आणि राज्याच्या प्रगतीसाठी व कल्याणासाठी प्रार्थना केली.

श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन आणि पाद्यपूजा केल्यानंतर, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (IAS) यांनी राजनाथ सिंह आणि देवेंद्र फडणवीस यांना शाल, श्रीफळ आणि श्री साईबाबांची मूर्ती देऊन सन्मानित केले.


या प्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील , विधान परिषदेचे सभापती मा. ना. श्री. राम शिंदे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.


केंद्रीय संरक्षण मंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त शिर्डी परिसरात आणि मंदिर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मान्यवरांनी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन आत्मिक शांतता लाभल्याची भावना व्यक्त केली.

साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आलेल्या नियोजनाबद्दल मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. या भेटीमुळे शिर्डीत भाविकांची आणि समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *