जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर ग्रामीण भागातील मुली आज प्रत्येक क्षेत्रात आपले नाव उज्ज्वल करत आहेत. याचाच प्रत्यय संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथे पाहायला मिळाला. येथील सुपुत्री आचल निलेश आव्हाड हिची मिरा-भाईंदर पोलीस दलात चालकपदी निवड झाली आहे. या यशाबद्दल शिबलापूर ग्रामस्थांच्या वतीने आचलचा नागरी सत्कार करण्यात आला.
आचलचे प्राथमिक ते १२ वी पर्यंतचे शिक्षण अमृतवाहिनी (संगमनेर) येथे झाले आहे. आचलला पोलीस दलात जाण्याचा वारसा घरातूनच मिळाला आहे. तिचे आजोबा भाऊसाहेब आव्हाड हे पोलीस दलात सेवा बजावत होते, तर चुलते विनोद आव्हाड हे देखील पोलीस दलात होते. आता आचलची निवड झाल्याने आव्हाड कुटुंबाची ही तिसरी पिढी पोलीस दलाच्या माध्यमातून देशसेवा करणार आहे. तिची ही निवड आई कल्पना आणि वडील निलेश आव्हाड यांच्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे.
आचलचा हा प्रवास सोपा नव्हता. यापूर्वी दोन वेळा तिची निवड अवघ्या २ गुणांनी हुकली होती. मात्र, खचून न जाता तिने दिवसाला ८ ते १० तास अभ्यास आणि शारीरिक तयारीवर भर दिला. स्पर्धेच्या युगात पालकांनी मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यास यश नक्की मिळते, हे आचलने सिद्ध करून दाखवले आहे.
आचलच्या या यशाचे कौतुक करण्यासाठी शिबलापूर येथील लक्ष्मी मंगल कार्यालय येथे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पचायत समिती माजी सदस्य निवृत्ती सांगळे, फटांगरे, भागवत कादळकर, अशोक आव्हाड, सरपंच प्रमोद बोंद्रे, उपसंरपच सुनिल मुन्तोंडे , विजय मुन्तोडे , दिपकर रक्टे , संतोष फड, सहकार महर्षी थोरात कारखान्याचे संचालक दिलीप नागरे, शीतल उगलमुगले, राम घुगे, संजय कराड, भिमा खैरे, दिनकर बोंद्रे , पत्रकार राजेश गायकवाड यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व नातेवाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व वातावरण निर्मिती दिलीप गायकवाड यांनी संगीतमय पद्धतीने केली.
यावेळी बोलताना निवृत्ती सांगळे म्हणाले की, “ग्रामीण भागातील मुलगी चालक म्हणून पोलीस दलात निवडली जाणे हे गावाचे भूषण आहे. तिचे धैर्य कौतुकास्पद आहे.” तर शीतल उगलमुगले यांनी आचलच्या आई-वडिलांच्या कष्टाचे आणि योगदानाचे कौतुक केले. फटांगरे यांनी आचलच्या संघर्षाचा उल्लेख करत सांगितले की, “दोन वेळा अपयश येऊनही तिने जिद्द सोडली नाही, ८-१० तास अभ्यास करून तिने हे यश खेचून आणले .
वरुण राजाच्या हजेरीत निघाली मिरवणूक
सत्कार समारंभापुर्वी आचलची गावातून डीजेच्या तालावर वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पावसाने देखील हजेरी लावली होती. मात्र, पावसाची तमा न बाळगता वरुण राजाच्या बरसरणाऱ्या सरींमध्ये महिलांनी फेर धरत आणि नाचत आपला आनंद साजरा केला. संपूर्ण शिबलापूर गावात सध्या आचलच्या यशाची चर्चा असून तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.”