आश्वी । झुंझार न्यूज

राहुरी तालुक्यातील कनगर येथे येत्या १४ मे रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडणार आहे. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले यांची राज्यसभेवर तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल, अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. या ऐतिहासिक सोहळ्याच्या नियोजनासाठी संगमनेर तालुक्यातील पुर्व व पठार भागातील विविध गावांमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला.

१४ मे रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी आणि नियोजनासाठी शिबलापूर, पानोडी, वरवंडी, खांबा, खर शिंदे, आश्वी आणि उंबरी या गावांचा झंझावती दौरा करण्यात आला. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) आणि विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून कार्यक्रमाच्या रूपरेषेबाबत माहिती देण्यात आली.

या जनसंपर्क मोहिमेमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात, संगमनेर तालुका अध्यक्ष आशिष शेळके, एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिलभाऊ बर्डे यांनी मार्गदर्शन केले. तसेच ज्येष्ठ नेते गोविंदराव दिवे, भाऊसाहेब दिवे, राजूभाऊ दिवे, बाळासाहेब कदम, योगेश मुनतोडे, नानाभाऊ कदम, रमेश भोसले, संपत भोसले, मेजर भोसले, भरत भोसले, सिद्धार्थ भोसले, केरुनाथ भोसले, सागर शिंदे, विशाल मुनतोडे, पानोडीचे माजी उपसंरपच अशोक तळेकर , रावसाहेब घुगे , रंगनाथ मुंडे , लक्ष्मण कदम, जय कदम यांच्यासह मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्ते सहभागी झाले होते.
ज्या ज्या ठिकाणी हा जनसंपर्क दौरा गेला, त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने कार्यकर्त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण आणि आपल्या नेत्याचा (रामदास आठवले) सन्मान हा संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण आहे,” अशा भावना यावेळी सुरेंद्रभाऊ थोरात यांनी व्यक्त केल्या.

या ऐतिहासिक सोहळ्याला राहुरी, संगमनेर आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील भीमसैनिकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून १४ मे रोजी कनगरमध्ये भीमसागर लोटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


