{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्त

आश्वी । झुंझार न्यूज

शासकीय सर्वेक्षणाचे काम करत असताना अचानक प्रकृती बिघडून निधन झालेल्या कोल्हार येथील आशा सेविका श्रीमती विमल भोसले यांच्या कुटुंबाला ‘आशा कर्मचारी संघटना (आयटक)’ च्या वतीने मदतीचा हात देण्यात आला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भोसले यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या वारसांकडे आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्त केला.

कोल्हार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका श्रीमती विमल भोसले या २३ मे २०२६ रोजी शासकीय सर्वेक्षणाचे काम करत होत्या. हे काम करत असतानाच त्यांना अचानक चक्कर आली आणि त्या कोसळल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी प्रवरा रुग्णालय (लोनी) येथे दाखल करण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने कोल्हार परिसरात आणि आरोग्य विभागात हळहळ व्यक्त केली जात आहे.


श्रीमती भोसले यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. त्यांच्या पश्चात धनंजय आणि गगन ही दोन मुले आणि सुवर्णा ही मुलगी असा परिवार आहे. कुटुंबाचा आधार गेल्याने त्यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर राहाता आरोग्य विभागामार्फत त्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे.


विमल भोसले या ‘आशा कर्मचारी संघटना आयटक’ च्या निष्ठावान सदस्य होत्या. आपल्या सहकाऱ्याच्या कुटुंबावर आलेल्या या कठीण प्रसंगात खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय संघटनेने घेतला. संघटनेच्या वतीने जमा झालेला आर्थिक मदतीचा धनादेश त्यांचा मुलगा धनंजय व मुलगी सुवर्णा यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.


हा धनादेश आशा सुपरवायझर सौ. रेणुका निर्मळ, सौ. वर्षा मांडुळे आणि संघटनेचे कार्याध्यक्ष कॉ. सुरेश पानसरे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी संघटनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्या सौ. ज्योती पंडुरे आणि आयटकच्या राज्य कार्यकारिणी सदस्या सौ. जयश्री गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.


या दुःखद प्रसंगी भावना व्यक्त करताना संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. कॉ. सुधीर टोकेकर म्हणाले की, विमलताईंचे अपघाती निधन ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. संघटनेने दिलेली मदत ही त्यांच्या जाण्याची पोकळी भरून काढू शकत नाही, परंतु आपल्या कुटुंबातील एका सदस्याच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, हीच आमची भावना आहे. अहिल्यानगर जिल्हा आशा कर्मचारी संघटना सदैव आपल्या कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणीत आणि सुख-दुःखात सोबत राहील.


या प्रसंगी आशा कर्मचारी सौ. सोनाली शेजुळ, शशिकला गायकवाड, मंदाकिनी ब्राम्हणे, अश्विनी गोसावी, मनीषा मुनमूने, शोभा शिंदे, सविता राजभोज, निर्मला राजभोज यांच्यासह अनेक कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *