सरकारकडून लाडक्या बहिणींची मोठी फसवणूक

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची सरकारवर टीका



संगमनेर । झुंझार न्यूज

 

लाडक्या बहिणींनी मतदान केले म्हणून सध्याचे महायुती सरकार सत्तेवर आले आहे. मात्र राज्यातील 81 लाख महिलांना अपात्र करून राज्यातील सरकारने लाडक्या बहिणींना मोठा धोका दिल्या असून त्यांची फसवणूक केली असल्याची टीका काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.


संगमनेर येथे माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना महाराष्ट्राचे माजी महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सध्याचे सरकार हे लाडक्या बहिणींच्या मुळे सत्तेवर आले आहे. मात्र आता 81 लाख महिलांना अपात्र करून या सर्व महिलांना धोका देण्याचे काम या सरकारने केले आहे .किंबहुना सरकारने या लाडक्या बहिणींची मोठी फसवणूक केली आहे.

यशवंतरावजी चव्हाण यांच्यापासून सुरू झालेली महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकीय परंपरा आता मोडीत निघाली आहे. सर्वत्र भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या भ्रष्टाचाराचे पैसे मतदारांपर्यंत दिले जात आहे. खऱ्या कार्यकर्त्याची किंमत कमी झाली आहे.

सर्वांना भाजपमध्ये घेतले जात आहे. एक दिवस ओरिजनल भाजपचे कार्यकर्ते कुठे दिसणार नाही. अशी परिस्थिती सर्वत्र निर्माण झाली आहे. सर्वजण भाजपमध्ये जात आहे त्यामुळे नवीन नेतृत्व निर्माण होणार आहे. सध्या देशामध्ये प्रादेशिक पक्ष संपवण्याचे काम सुरू आहे. भारतामध्ये काँग्रेस आणि भाजप हे दोनच पक्ष शिल्लक राहतील अशी परिस्थिती आहे. काँग्रेसमध्ये तरुणांना मोठी संधी असून नवीन नेतृत्वाची पोकळी काँग्रेस भरून काढणार आहे. येणाऱ्या काळामध्ये जनता काँग्रेसच्या पाठीमागे ठाम उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 याचबरोबर राज्यातील राजकारण हे अत्यंत दुर्दैवी सुरू असून या सर्व गोष्टींकडे जनतेने जाणीवपूर्वक पाहिले पाहिजे. आणि ही सर्व दुरुस्ती करण्याची जबाबदारी सुद्धा जनतेची असल्याचे काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *