संगमनेर तालुक्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी कोणत्याही अफवा, दिशाभूल करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट किंवा स्वतःला योजनेचे पदाधिकारी म्हणून मिरवणाऱ्या व्यक्तींच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन शिवसेना महायुतीच्या पूनम दायमा यांनी केले आहे.
प्रसिद्धीत दिलेल्या पत्रकात सौं दायमा म्हणाल्या की काही माजी पदाधिकारी ,किंवा स्वघोषित प्रतिनिधी शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या नावाचा आधार घेत केवळ प्रसिद्धी आणि राजकीय स्वार्थासाठी सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरविण्याचे काम करत आहेत. शासनाच्या योजनांवर स्वतःचा शिक्का मारण्याचा आणि महिलांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असून,अशा प्रवृत्तींना संगमनेर तालुक्यात थारा दिला जाणार नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची जनकल्याणकारी योजना असून, तिच्या अंमलबजावणीबाबत अधिकृत माहिती व मार्गदर्शनासाठी लाभार्थी महिलांनी पंचायत समिती च्या महिला बालकल्याण विभागाशी अथवा आमदार अमोल खताळ पा. यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा. कोणत्याही स्वघोषित व्यक्ती, सोशल मीडिया पोस्ट किंवा राजकीय स्टंटबाजांकडून दिशाभूल होऊ नये.महिलांच्या विविध प्रश्नांवर संवेदनशीलपणे काम करण्याऐवजी काही मंडळी केवळ सोशल मीडिया वर खोटी प्रतिष्ठा मिरविण्याचा प्रयत्न करत आहेत. शासनाच्या योजनांचा गैरवापर करून स्वतःची राजकीय पोळी भाजणाऱ्यांना संगमनेर तालु क्यातील जागरूक माता-भगिनी योग्य वेळी उत्तर देतील. महिलांच्या हिताच्या योजनांवर राजकारण करण्याऐवजी त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
लाडक्या बहिणींच्या हक्कासाठी आमदार अमोलभाऊ खताळ पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय कायम तत्पर असून, कोणत्याही अडचणी साठी महिलांनी थेट कार्यालयाशी अथवा संबंधित शासकीय विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पूनम दायमा याच्याकडून करण्यात आले आहे.