विधानसभेत आमदार अमोल खताळ झाले आक्रमक

 

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

 

तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२५ चा पीकविमा अद्याप मिळालेला नसल्याचा गंभीर प्रश्न आमदार अमोल खताळ यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात प्रभावीपणे उपस्थित केला. यावेळी त्यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे लक्ष वेधत तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीकविम्याचा लाभ देण्याची मागणी केली.

आमदार खताळ यांनी सभागृहात मांडलेल्या माहितीनुसार, खरीप हंगाम २०२५ दरम्यान तालुक्यातील अनेक भागांत अतिवृष्टी, अवकाळी पाऊस तसेच इतर प्रतिकूल हवामानामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. मात्र कृषी विभागाच्या प्रशासकीय त्रुटी व संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना अद्याप पीकविम्याचा लाभ मिळालेला नाही. शेतकऱ्यांनी नियमांनुसार विमा भरलेला असतानाही त्यांना हक्काची नुकसान भरपाई मिळाली नसल्याने तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर हा अन्याय असल्याचे त्यांनी सभागृहात ठामपणे मांडले.

पीकविमा योजनेच्या अंमलबजावणीत झालेल्या त्रुटींसाठी जबाबदार असलेल्या कृषी विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच विमा कंपनीला आवश्यक निर्देश देऊन संगमनेर तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीकविम्याची रक्कम वितरित करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी कृषिमंत्री भरणे यांच्याकडे केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आपण सातत्याने पाठपुरावा करणार असून, तालुक्यातील एकाही पात्र शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका आमदार खताळ यांनी यावेळी व्यक्त केली.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *