१ जुलैला शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

 

शिर्डी । झुंझार न्यूज


गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग आणि राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वे प्रश्नाबाबत आता राज्य स्तरावर हालचालींना वेग आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमधील अडथळे दूर करण्यासाठी नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे एक संयुक्त शिष्टमंडळ बुधवार, दिनांक १ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. या भेटीत सकारात्मक तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारकडेही पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

विधानभवनात नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाबाबत मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत प्रकल्पाची सद्यस्थिती आणि त्यातील तांत्रिक अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

विकासासाठी हायस्पीड रेल्वे काळाची गरज


बैठकीत बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, “पुणे आणि नाशिक ही दोन महत्त्वाची महानगरे रेल्वेने जोडली जाणे राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत गरजेचे आहे. या हायस्पीड रेल्वेमुळे दळणवळणाची गती वाढून उद्योग आणि व्यापाराला मोठी चालना मिळेल. जनतेच्या भावना या प्रकल्पाशी जोडल्या गेल्या असून, हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचीही दिल्लीत भेट घेणार आहोत.

या बैठकीत माजी मंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे (Video Conferencing) सहभाग नोंदवला. त्यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडताना सांगितले की, “पुणे-नाशिक रेल्वे मार्गात खोडद येथील ‘जीएमआरटी’ (GMRT) प्रकल्पाच्या लहरींचा तांत्रिक अडथळा येत आहे. मात्र, जगात इतर देशांत अशा प्रकारच्या समस्या असतानाही रेल्वे मार्ग यशस्वीपणे कार्यान्वित झाले आहेत. हाच धागा पकडून आपण केंद्राकडे पाठपुरावा केल्यास हा प्रश्न सुटू शकतो.” याबाबत त्यांनी यापूर्वीच रेल्वे मंत्र्यांशी प्राथमिक चर्चा केल्याचेही नमूद केले.


नाशिक-पुणे मार्गासोबतच राहुरी-शनिशिंगणापूर या रेल्वे मार्गाबाबतही बैठकीत चर्चा झाली. या मार्गासाठी जमिनी संपादित करताना शेतकऱ्यांच्या असलेल्या भावना आणि त्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या जातील, असे आश्वासन विखे पाटील यांनी दिले.

 


या महत्त्वपूर्ण बैठकीस आमदार माणिकराव कोकाटे, शरद सोनवणे, बाबाजी काळे, विठ्ठल लंघे, शिवाजी आढळराव पाटील, सत्यजित तांबे, प्राजक्ता तनपुरे, अमोल खताळ, अक्षय कर्डिले यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

१ जुलै रोजी होणाऱ्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर या प्रकल्पाबाबत नेमकी काय घोषणा होते, याकडे आता तिन्ही जिल्ह्यांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *