घरकुल अनुदानासाठी २० हजारांची लाच घेताना कारवाई
झरेकाठी । झुंझार न्यूज
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाचा पुढील हप्ता मोकळा करून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील कंत्राटी लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल आणि ग्रामपंचायत प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात ग्रामविकास अधिकाऱ्यासह कंत्राटी अभियंता अशा एकूण तिघांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, हैदर याकुब पटेल (वय ५६, ग्रामविकास अधिकारी), ज्ञानदेव मोहन डुकरे (वय ४३, कंत्राटी लिपिक) आणि सचिन हौशीराम ब्राह्मणे (कंत्राटी अभियंता) अशी आरोपींची नावे आहेत. या तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ व १२ नुसार कारवाई करण्यात आली आहे.

तक्रारदाराला सन २०२३ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. त्यांना आतापर्यंत १५ हजार रुपयांचा पहिला आणि ७० हजार रुपयांचा दुसरा हप्ता मिळाला होता. उर्वरित अनुदानाचे हप्ते मंजूर करून देण्यासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात संबंधित अधिकाऱ्यांनी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. हक्काचे पैसे मिळवण्यासाठी लाच द्यावी लागत असल्याने तक्रारदाराने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.
प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता, ग्रामविकास अधिकारी हैदर पटेल आणि कंत्राटी लिपिक ज्ञानदेव डुकरे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, मंगळवारी सात्रळ ग्रामपंचायत कार्यालय परिसरात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून २० हजार रुपये स्वीकारताना कंत्राटी लिपिक ज्ञानदेव डुकरे याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. या व्यवहारासाठी कंत्राटी अभियंता सचिन ब्राह्मणे याने प्रोत्साहन दिल्याचे तपासात समोर आले आहे.

ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सविता तांबे, राजू आल्हाट आणि त्यांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक छाया देवरे करत आहे .
शासकीय कामासाठी कोणत्याही लोकसेवकाने किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन एसीबीच्या वतीने करण्यात आले आहे.

