संविधानिक न्यायासाठी एकत्र येण्याचे आशिष शेळके यांचे आवाहन

आश्वी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील गावांमध्ये आज ‘जातीय उपवर्गीकरण’ या ज्वलंत आणि समाजाच्या भविष्याशी निगडित असलेल्या विषयावर एक महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत समाजाच्या हक्कांवर, संविधानिक न्यायावर आणि आगामी काळातील संघर्षाच्या दिशेवर सखोल चर्चा करण्यात आली.


यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी रोखठोक भूमिका मांडली. ते म्हणाले की, “जातीय उपवर्गीकरणाचा विषय हा केवळ राजकीय नसून तो आपल्या समाजाच्या अस्तित्वाशी आणि पुढच्या पिढीच्या भविष्याशी जोडलेला आहे. या विषयावर प्रत्येक समाजबांधवाने जागरूक राहणे ही काळाची गरज आहे. संविधानाने आपल्याला दिलेले अधिकार अबाधित राखण्यासाठी आपल्याला आता गाफील राहून चालणार नाही.”

‘हा केवळ चर्चेचा नव्हे, तर संकल्पाचा दिवस

शेळके यांनी पुढे नमूद केले की, आजची ही बैठक केवळ चर्चा करण्यासाठी नव्हती, तर आपल्या न्याय्य हक्कांसाठी एकजुटीने उभे राहण्याचा हा एक ‘दृढ संकल्प’ आहे. सामाजिक न्याय मिळवण्यासाठी आणि आपल्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी संघटित होण्याशिवाय पर्याय नाही. संविधानाच्या मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने आपला लढा अधिक तीव्र करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

युवक आणि महिलांचा मोठा सहभाग

या बैठकीला संगमनेरच्या पूर्व भागातील पानोडी , पिंप्री लौकी अजमपूर , खळी , वरवंडी , मालुंजे , डिग्रस , अंभोरे आदी  गावांमधील मोठ्या संख्येने युवक , कार्यकर्ते उपस्थित होते .

 भेटी, बैठकीदरम्यान अनेकांनी आपली मते मांडली आणि उपवर्गीकरणाच्या तांत्रिक व सामाजिक बाजू समजून घेतल्या. “संघटित समाजच आपले हक्क मिळवू शकतो,” हा संदेश या बैठकीच्या माध्यमातून गावागावात पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करत चलो संगमनेरचा नारा देण्यात आला .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *