अहिल्यानगर । झुंझार न्यूज

समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि आपल्या कर्तृत्वाने आदर्श निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या परंपरेनुसार, सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य (स्वराज्य) यांच्या वतीने देण्यात येणारा मानाचा “राज्यस्तरीय समाजभूषण सन्मान २०२६” संगमनेर ( झरेकाठी ) येथील पत्रकार सोमनाथ भागवत डोळे यांना जाहीर झाला आहे.

पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम सोमनाथ डोळे हे दैनिक सार्वमत, दैनिक प्रभात, दैनिक राष्ट्र सह्याद्री, दैनिक नायक आणि दैनिक सार्व मंथन अशा विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून करत आहेत. त्यांच्या या संघर्षाचा, जिद्दीचा आणि समाजहितार्थ असलेल्या धडपडीचा यथोचित सन्मान करण्यासाठी सरपंच सेवा संघाच्या निवड समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.

हा भव्य गौरव सोहळा रविवार, दिनांक ०५ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता, अहिल्यानगर येथील सावेडी रोडवरील माऊली संकुल सभागृहात संपन्न होणार आहे.

हा सोहळा सरपंच सेवा संघाचे संस्थापक तथा संघटित चळवळीचे नेते मा. बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे. यावेळी शिर्डी लोकसभेचे खासदार मा. भाऊसाहेब वाकचौरे, ग्रामसेवक नेते मा. एकनाथराव ढाकणे यांच्या शुभहस्ते सोमनाथ डोळे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याप्रसंगी मा. यादवराव पावसे पाटील आणि सरपंच सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष मा. रोहित संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या निवडीबद्दल सरपंच सेवा संघाचे सरचिटणीस बाबासाहेब पावसे, संपर्क प्रमुख अमोल शेवाळे, कायदेशीर सल्लागार प्रविण कडाळे आणि राज्यातील सरपंच बांधवांनी सोमनाथ डोळे यांचे अभिनंदन केले आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *