संगमनेर । झुंझार न्यूज

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) आगामी काळात भरली जाणारी हजारो रिक्त पदे आणि येऊ घातलेला ८ वा वेतन आयोग या पार्श्वभूमीवर, सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी संगमनेरमध्ये एक सुवर्णसंधी चालून आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेचे सर्वात सक्षम मार्गदर्शन केंद्र म्हणून ओळख निर्माण करण्याच्या निर्धाराने, **’गरुड भारतीय प्रशासकीय सेवा प्रशिक्षण अकॅडमी’**चे उद्घाटन येत्या १२ जुलै रोजी संपन्न होणार आहे.

पुणे-नाशिकच्या धर्तीवर आता ‘संगमनेर पॅटर्न


ज्याप्रमाणे शिक्षणासाठी ‘लातूर पॅटर्न’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, त्याच धर्तीवर सरकारी नोकरीच्या पूर्वतयारीसाठी ‘संगमनेर पॅटर्न’ निर्माण करण्याचा ठाम विश्वास अकॅडमीच्या संचालिका सौं. किरण गणेश गागरे यांनी व्यक्त केला आहे. पुणे ते नाशिक आणि मुंबई ते गडचिरोली अशा विस्तीर्ण पट्ट्यातील विद्यार्थ्यांना संगमनेरमध्येच उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने ही अकॅडमी सुरू करण्यात येत आहे.

गट ‘ड’ पासून क्लास वन ऑफिसरपर्यंतचे मार्गदर्शन


या अकॅडमीच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलताना सौ. किरण गागरे म्हणाल्या की, “संगमनेरात निर्माण होणाऱ्या या गरुड अकॅडमीत गट ‘ड’ च्या पदांपासून ते क्लास १ (राजपत्रित अधिकारी) पर्यंतच्या सर्व परीक्षांचे सखोल मार्गदर्शन एकाच छताखाली मिळणार आहे. हे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी टाकलेले एक मोठे पाऊल आहे.”

हरलेल्या उमेदवारांना जिंकण्यासाठी घडवणार!


पोलीस भरती संदर्भात बोलताना त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. त्या म्हणाल्या, “पोलीस भरतीसाठी आपल्या भागात असंख्य उमेदवार आहेत. निवड झालेले उमेदवार सर्वच संस्था दाखवतात, पण जे विद्यार्थी थोड्या गुणांनी राहून गेले आणि वर्षानुवर्षे तयारी करत आहेत, त्यांच्या दुर्दैवाचा विचार कोणी करत नाही. आम्ही अशा ‘हरलेल्या’ विद्यार्थ्यांना पुन्हा उभे करून त्यांना यशापर्यंत पोहोचवणार आहोत. आमच्याकडे प्रवेश किती झाले यापेक्षा निवड किती झाली, हे आम्ही पालक आणि विद्यार्थ्यांना पारदर्शकपणे दाखवू. यशस्वी विद्यार्थ्यांचे ९९ टक्के प्रमाण राखण्याचे आमचे ध्येय आहे.”

शेतकऱ्यांच्या पोरांसाठी हक्काचे व्यासपीठ


ग्रामीण भागातील, विशेषतः शेतकऱ्यांची मुले कष्टकरी आणि कणखर असतात. त्यांच्यात यश खेचून आणण्याची जिद्द असते. या मुलांची बौद्धिक मशागत करून त्यांना अधिकारी बनवण्यासाठी गरुड अकॅडमी कटिबद्ध आहे. “मैदानी परीक्षेत ५० पैकी ५० आणि लेखी परीक्षेत १०० पैकी १०० गुण मिळवून देण्याची तयारी आम्ही करून घेणार आहोत. येणाऱ्या काळात प्रत्येक सरकारी कार्यालयात पहिला विद्यार्थी हा गरुड अकॅडमीचाच असेल,” असा ठाम विश्वासही सौ. गागरे यांनी व्यक्त केला.

या नव्या शैक्षणिक उपक्रमामुळे संगमनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.