‘यशोधन’मधील काइंडनेस ट्री उपक्रमांनी बहरले; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

आश्वी । झुंझार न्यूज

सध्याच्या धावपळीच्या युगात आणि सोशल मीडियाच्या काळात समाजामध्ये वाढलेली नकारात्मकता दूर व्हावी, एकमेकांप्रती आदरभाव, जिव्हाळा आणि आत्मीयता निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेर तालुक्यात ‘मंथ ऑफ काइंडनेस’ (जुलै फॉर काइंडनेस) हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शहर आणि तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या ‘यशोधन’ जनसंपर्क कार्यालयातील ‘काइंडनेस ट्री’ विद्यार्थ्यांच्या सत्कृत्यांनी बहरून गेली आहे.

यशोधन कार्यालयामध्ये एक प्रतिकात्मक ‘काइंडनेस ट्री’ (दयाळूपणाचे झाड) तयार करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभागी होणारे विद्यार्थी आणि युवक दिवसभरात त्यांनी केलेल्या चांगल्या कामांची किंवा दयाळूपणाच्या कृतीची माहिती एका कागदाच्या पानाववर लिहून या झाडाला चिटकवत आहेत. यामध्ये पक्ष्यांना दाणापाणी देणे, वृद्ध व्यक्तींना रस्ता ओलांडण्यास मदत करणे, आई-वडिलांना घरकामात हातभार लावणे, प्रत्येकाशी गोड बोलणे, आजी-आजोबांशी गप्पा मारणे आणि प्राण्यांप्रती दयाभाव दाखवणे अशा अनेक छोट्या पण महत्त्वपूर्ण कृतींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांना पाठिंबा देणारे संदेशही या झाडावर पाहायला मिळत आहेत.


या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव प्रगल्भ होत आहे. मुले केवळ अभ्यासातच नाही, तर संस्कारांच्या बाबतीतही पुढे जात असल्याचे पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. घरात आणि समाजात वावरताना मुले ज्या पद्धतीने एकमेकांना मदत करत आहेत, त्यामुळे पालकांना एक वेगळीच सुखद अनुभूती मिळत आहे.


या उपक्रमाबाबत बोलताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, आज सकाळी टीव्ही सुरू केला की ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली नकारात्मक बातम्यांचा मारा होतो. सोशल मीडिया उघडला की द्वेष आणि नकारात्मकता दिसते. जागतिक स्तरावरही युद्धाची सावली आहे. अशा परिस्थितीत समाजात जिव्हाळा आणि अस्मिता टिकवून ठेवण्यासाठी ‘मंथ ऑफ काइंडनेस’ सुरू केला आहे. केवळ पर्यावरण संवर्धनच नाही, तर शाळा, महाविद्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे व छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद शोधणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.


माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याने नेहमीच सहकार, विकास आणि सामाजिक क्षेत्रात राज्याला दिशा दिली आहे. आता डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या या ‘जुलै फॉर काइंडनेस’ उपक्रमाने मानवता आणि एकात्मतेचा नवा संदेश दिला आहे. हा उपक्रम केवळ एका महिन्यापुरता मर्यादित न राहता, ती एक जीवनशैली बनावी, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *