खळी । झुंझार न्यूज

 


संगमनेर तालुक्यातील खळी आणि पंचक्रोशीतील नागरिकांसाठी एक धोक्याची घंटा असून, परिसरात भिक्षेकऱ्याच्या वेशात वावरणाऱ्या एका संशयास्पद व्यक्तीने नागरिकांना थेट धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


दिनांक १७ जुलै २०२६ रोजी खळी येथील सुभाष लबडे आणि लक्ष्मण उगलमुगले यांच्या घरी एक अज्ञात व्यक्ती भिक्षेकऱ्याच्या वेशात आली होती. त्या वेळी घरामध्ये केवळ महिला होत्या. मानवतेच्या भावनेतून महिलांनी त्याला भिक्षा दिली. आपण “मढीवरून आलो आहोत” असे सांगणाऱ्या या व्यक्तीने भिक्षा घेतल्यानंतरही परिसरात रेंगाळत घराची पाहणी करण्यास सुरुवात केली

 

काही वेळाने या व्यक्तीने महिलांकडे ५०० रुपयांची मागणी केली. ही बाब सुभाष लबडे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्या व्यक्तीला जाब विचारला. त्यावर संबंधित व्यक्तीने नम्र राहण्याऐवजी लबडे यांना शिवीगाळ करत दमदाटी केली. “आम्ही रात्री पण येऊ, तुमचे सोने-पैसे कसे सांभाळता ते बघतोच,” अशा उघड धमक्या देऊन तो तेथून निघून गेला.


सदर संशयास्पद व्यक्ती MH 17 CT 4357 या क्रमांकाच्या मोटारसायकलवरून आली होती. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे

या घटनेच्या पार्श्वभूमीवर खळी आणि परिसरातील गावांमध्ये सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.


१. अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देऊ नका.
२. घरात महिला, ज्येष्ठ नागरिक किंवा मुले एकटी असताना अधिक दक्षता बाळगा.
३. कोणताही संशयास्पद प्रकार, व्यक्ती किंवा वाहन आढळल्यास तातडीने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा.

भिक्षेकऱ्यांच्या वेशात फिरणाऱ्या अशा व्यक्तींपासून सावध राहणे आता काळाची गरज बनली आहे.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *