अकोले । झुंझार न्यूज
अकोले तालुक्यातील राजूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध दारू साठ्यावर छापा टाकला. या कारवाईत सुमारे १ लाख ६४ हजार ३३५ रुपये किमतीच्या विविध कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या आणि चारचाकी वाहन असा एकूण ६ लाख ६४ हजार ३३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सोनू दिलीप मुर्तडक (वय २८) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत एक महत्त्वाची माहिती मिळाली. राजूर येथील वंजार गल्लीमध्ये एका चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणावर दारूचा साठा आणण्यात आला असल्याचे समजले. माहिती मिळताच स.पो.नि. पवार यांनी तात्काळ कारवाईचे नियोजन केले.

स.पो.नि. किशोर पवार यांनी पोलीस कॉन्स्टेबल सचिन शिंदे, वाय. एन. जाधव, डी. डी. परते, एस. वाय. रत्नपारखी आणि दोन शासकीय पंचांना पाचारण केले. पथकाने वंजार गल्लीत छापा टाकला असता, त्या ठिकाणी एम. एच. ०३ ए आर ०१९४ क्रमांकाची संशयास्पद गाडी उभी असलेली आढळली. पोलिसांनी गाडीची मालकी तपासली असता ती सोनू मुर्तडक याची असल्याचे निष्पन्न झाले.

सोनू मुर्तडक याला बोलावून गाडीतील मालाबाबत विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी पंचांसमक्ष गाडीची झडती घेतली असता, त्यात विविध नामांकित कंपन्यांच्या दारूच्या बाटल्यांचा साठा मिळून आला.

जप्त केलेल्या दारूच्या साठ्याची तपासणी केली असता, त्यातील काही दारू बनावट असल्याचे, तर काही दारूच्या विक्रीवर महाराष्ट्र राज्यात बंदी असल्याचे दिसून आले. या गंभीर प्रकारामुळे स.पो.नि. पवार यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक सावखेडकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना पाचारण केले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनीही सदर मुद्देमाल बनावट असल्याचे प्रथमदर्शनी मान्य केले.

पोलिसांनी जप्त केलेल्या साठ्यातून रासायनिक परीक्षणासाठी (Chemical Analysis) प्रत्येकी तीन बाटल्यांपैकी एक नमुना नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठवण्यासाठी घेतला आहे. आरोपी सोनू मुर्तडक याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ आणि भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

