संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर परिसरात १८ एप्रिल २०२६ च्या रात्री उच्छाद मांडणाऱ्या आणि पाच लाखांहून अधिक रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. त्यामुळे अनेक प्रलंबित गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
१८ एप्रिल २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोडेखोरांनी उंबरी बाळापूर येथे धुमाकूळ घातला होता. घरफोडी करून चोरट्यांनी १० ते ११ तोळे सोने आणि ६० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ५ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या दरोड्यादरम्यान एका वृध्द महिलेच्या कानातील दागिने बळजबरीने ओरबाडल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली होती. यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला होता.
इतर गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे गुरुवारी, दिनांक १४ जुलै रोजी वाळकी शिवारातून सापळा रचून पोलिसांनी अजय सादीश काळे (वय २४, रा. वाळुंज, जि. अहिल्यानगर) आणि अक्षय उर्फ सोन्या अर्पन भोसले (वय २६, रा. घानेगाव, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) या दोन सराईत गुन्हेगार ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्यानंतर दोन्ही सराईत गुन्हेगारांकडे केलेल्या कसून चौकशीत त्यांनी आपल्या ८ ते ९ साथीदारांसह अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. यामध्ये आश्वी पोलीस ठाण्यात १८ एप्रिल २०२६ रोजी दाखल असलेल्या गु.र.नं. ७४/२०२६, बीएनएस कलम ३०५ (a), ३३१ (६), ३ (५)) या गुन्ह्याची देखील कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पकडलेल्या दोन्ही आरोपीवर जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरही दरोडा, जबरी चोरी व घरफोडी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अटकेमुळे आश्वीसह पंचक्रोशीत गेल्या काही दिवसांत घडलेल्या विविध चोरी आणि दरोड्याच्या घटनांचा तपास लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून पोलीस या टोळीच्या इतर फरार साथीदारांचा शोध घेत आहेत.