आश्वी । झुंझार न्यूज

आदिवासी समाजाने विखे पाटील परिवारावर गेल्या ४० वर्षांपासून दाखवलेले प्रेम आणि विश्वास ही आमच्यासाठी केवळ राजकीय ताकद नसून एक मोठी जबाबदारी आहे  समाजाच्या प्रत्येक प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहून तो मार्गी लावण्यासाठी आम्ही तत्परतेने काम करत राहू,” अशी ग्वाही भाजपा राज्य उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.


संगमनेर तालुक्यातील रहिमपूर येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ सुजय विखे पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांताराम शिंदे हे होते .

यावेळी व्यासपीठावर संगमनेरचे आमदार अमोल खताळ , रिपाई तालुकाध्यक्ष आशिष शेळके ,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सचिन शिंदे , गणपतराव शिंदे, मारुतीराव मेंगाळ, संरपच सविताताई शिंदे, रामभाऊ राहाणे, प्रभाकर गुळवे, राहुल दिघे, अरुणराव शिंदे, एस.पी. आहेर, गोरख वाळुंज, सोमनाथ डोळे, रोहित चौधरी, भैया मोरे, पप्पू गाढे आदी मान्यवर उपस्थित होते

यावेळी डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की , “संगमनेरच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वेची अत्यंत आवश्यकता आहे. संगमनेरमार्गे रेल्वे नेण्याच्या मागणीसाठी आम्ही सर्वात पुढे उभे राहून या प्रयत्नांना पाठिंबा देऊ. रेल्वेसारखे मोठे प्रश्न केवळ तात्पुरत्या आंदोलनांनी सुटत नसून, त्यासाठी सातत्य, जिद्द आणि शासकीय पातळीवर एकत्रित प्रयत्नांची गरज असते. ज्याप्रमाणे शिर्डीला रेल्वे आणण्यासाठी अथक प्रयत्न झाले, त्याच जिद्दीने संगमनेरलाही रेल्वे स्थानक आणि आवश्यक रेल्वे सुविधा मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
या कामासाठी महायुती सरकार संगमनेर तालुक्याच्या प्रश्नांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आवश्यक तो पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


मागील वर्षी आदिवासी बांधवांना दिलेल्या आश्वासनांचा उल्लेख करत डॉ. विखे पाटील म्हणाले, गेल्या वर्षी दिलेल्या शब्दांनुसार १८ वर्षांखालील मुलांसाठी आधारकार्ड शिबिर घेऊन त्यांना आधारकार्ड उपलब्ध करून देण्यात आले. पावसाळ्यात ज्या कुटुंबांच्या घरात पाणी शिरले होते, तिथे स्वतः जाऊन मदत कार्य केले; ज्यामुळे यंदा तशी परिस्थिती निर्माण झाली नाही. आता पुढील वर्षी या कार्यक्रमाला येण्यापूर्वी ‘वेडू आई सभामंडपाचे’ काम पूर्ण झालेले असेल, हा शब्द मी या व्यासपीठावरून देत आहे.


डॉ विखे पाटील पुढे म्हणाले की, “पद आणि राजकीय जबाबदाऱ्या येत-जातात, परंतु केलेली विकासकामे लोकांच्या मनात कायम राहतात. काम हीच आमची खरी ओळख असून स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुण्याईने व सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने आम्हाला समाजसेवेची ही संधी मिळाली आहे

आदिवासी समाजाचा केवळ मतदानापुरता विचार न करता, त्यांच्यात जाऊन त्यांचे छोटे-मोठे प्रश्न समजून घेणे गरजेचे आहे. समाजातील मुलांनी उच्च शिक्षण घेतले तर त्यांच्या कुटुंबाला मोठा आधार मिळेल आणि समाजाचे भविष्य घडेल. पुढील ५ ते १० वर्षांत आदिवासी समाजातील एखादा तरुण किंवा तरुणी जिल्ह्याच्या प्रशासकीय सर्वोच्च पदावर पोहोचावी, या दृष्टीने शिक्षणाचा संकल्प करणे आवश्यक आहे,” असे आवाहन डॉ. विखे पाटील यांनी केले.


यावेळी आमदार अमोल खताळ म्हणाले की , आदिवासी बांधवांच्या जमिनी बळकावण्याच्या तक्रारींबाबत प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. संबंधितांना न्याय मिळवून देण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न केले जात आहेत वनहक्कांशी संबंधित जमिनींच्या नोंदी, स्वतंत्र सातबारा उतारा आणि गाव नमुना यांसारख्या प्रश्नांवर शासनाने घेतलेल्या निर्णयांचा मोठा फायदा समाजबांधवांना होत आहे.


शिक्षणाच्या आणि क्रीडा क्षेत्रातील संधींचा लाभ घेऊन युवकांनी पुढे यावे, असे आवाहन करत आमदार खताळ यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही दिली.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *