जैविक खते आणि सूक्ष्मजीव तंत्रज्ञान (Micro-technology) क्षेत्रात गेल्या साडेतीन दशकांपासून अखंडपणे कार्यरत असणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि ‘मल्टिमोल मायक्रो फर्टिलायझर इंडस्ट्री’चे (Multimol Micro Fertilizer Industry) संचालक डॉ. लक्ष्मण साखाहारी डोळे यांना नुकत्याच पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात ‘झी २४ तास कृषी सन्मान’ देऊन गौरविण्यात आले.
अतुलनीय योगदानाची दखल
‘झी २४ तास डिजिटल’च्या वतीने राज्यस्तरीय कृषी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आधुनिक शेतीमध्ये जैविक खतांचे महत्त्व ओळखून, मायक्रो बायोटेक्नॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी या विषयात डॉ. डोळे यांनी केलेले संशोधन आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेले तंत्रज्ञान याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. ३५ वर्षांच्या त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि निष्ठेचा हा यथोचित गौरव मानला जात आहे.
या सोहळ्यात महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय (मामा) भरणे आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या शुभहस्ते डॉ. डोळे यांना सन्मानित करण्यात आले. कृषी क्षेत्रातील कष्टाचे आणि परंपरेचे प्रतीक असलेल्या बैलगाडीचे आकर्षक मॉडेल असलेले सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी सोमनाथ डोळे , कृषी क्षेत्रातील नामांकित उद्योजक, प्रगतशील शेतकरी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. लक्ष्मणराव डोळे हे संगमनेर तालुक्यातील झरेकाठी गावचे सुपुत्र आहेत. एका ग्रामीण भागातून येऊन जागतिक स्तरावरील तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी खत उद्योगात आपले स्थान निर्माण केले आहे. या पुरस्कारामुळे केवळ झरेकाठी गावाचेच नव्हे, तर संपूर्ण अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर उंचावले आहे.
शाश्वत शेती आणि मातीचे आरोग्य जपण्यासाठी डॉ. डोळे यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. त्यांच्या या यशाबद्दल संगमनेर तालुका आणि जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि कृषी क्षेत्रातील व्यक्तींकडून त्यांचे विशेष अभिनंदन केले जात आहे. “हा सन्मान म्हणजे विज्ञानाची कास धरून केलेल्या प्रामाणिक कष्टाचा विजय आहे,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.