प्रवरानगर येथे विखे-पाटील राज्यस्तरीय साहित्य व कलागौरव पुरस्कारांचे दिमाखदार वितरण
प्रवरानगर । झुंझार न्यूज
भविष्यकाळ अंधकारमय होण्यापूर्वीच आपल्याला मराठी शाळांच्या सुधारणेचा आग्रह धरावा लागेल. मराठी शाळा आणि पुस्तके पुरवणारी ग्रंथालये हीच मराठीची खरी वस्त्रे आहेत. खरा महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल, तर मराठीसाठी धाडसाने पावले उचलावी लागतील. तुमच्या खांद्यावर झेंडा कोणताही असू द्या, पण त्याचा दांडा मात्र मराठीचाच ठेवा,” असा कळकळीचा आणि आश्वासक सूर ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांनी आळवला.

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या १२६ व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित राज्यस्तरीय साहित्य, कलागौरव आणि प्रबोधन पुरस्कारांच्या वितरण सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

या सोहळ्याला जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के-पाटील, आ. मोनिका राजळे, आ. काशिनाथ दाते, आ. आशुतोष काळे, आ. विठ्ठलराव लंघे, आ. संग्राम जगताप, आ. अमोल खताळ, आ. प्राजक्त तनपुरे, माजी आमदार लहू कानडे, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे-पाटील, चेअरमन डॉ. सुजय विखे-पाटील, सौ. शालिनीताई विखे-पाटील यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

यंदाचा मानाचा ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे (नाशिक) यांना प्रदान करण्यात आला. अन्य पुरस्कारांचे स्वरूप खालीलप्रमाणे राहिले
उत्कृष्ट साहित्य पुरस्कार: संहिता राजन (पुणे)
विशेष साहित्य पुरस्कार: सुरेंद्र दरेकर (पुणे)
कलागौरव पुरस्कार (तमाशा क्षेत्र): मालती इनामदार (नारायणगाव)
नाट्यसेवा पुरस्कार: सचिन शिंदे (नाशिक)
समाजप्रबोधन पुरस्कार: मराठी अभ्यास परिषद (पुणे)
अहिल्यानगर जिल्हा साहित्य पुरस्कार: निवृत्ती जोरी (संगमनेर)
प्रोत्साहनपर साहित्य पुरस्कार: संजय गोर्डे (संगमनेर)
पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली होती.
मराठी शाळांची झेप गरुडासारखी – विश्वासराव पाटील
आपल्या भाषणात विश्वासराव पाटील यांनी मराठी माध्यमाच्या शाळांचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, “इंग्रजी शाळांतील मुले सोन्याच्या पिंजऱ्यातील पोपटासारखी आहेत, मात्र जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील मुले गरुडासारखी उंच भरारी घेण्याची क्षमता ठेवतात. भारतातील ९८ टक्के शास्त्रज्ञ मराठीतून शिकले आहेत, हे विसरून चालणार नाही.” तसेच, अहमदनगर जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा सांगताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणातील साडेतीन वर्षांचा काळ याच मातीत गेल्याची आठवण करून दिली.

पवार-विखे कुटुंबाचे जिव्हाळ्याचे नाते – सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विखे-पाटील आणि पवार कुटुंबातील जुन्या ऋणानुबंधांना उजाळा दिला. “सहकार पंढरीचे दर्शन घेण्याचे भाग्य आज मला मिळाले. विखे-पाटील परिवाराची चौथी पिढी समाजकार्यात सक्रिय आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. लेखकांमधील संवेदनशील शक्तीच समाजाला समृद्ध करते,” असे त्या म्हणाल्या.
पुरस्कारामुळे लेखणीला बळ – उत्तम कांबळे
जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित झालेले उत्तम कांबळे यांनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, “हा पुरस्कार लेखणीच्या मागे समाज उभा असल्याचे प्रतीक आहे. डॉ. बाळासाहेब विखे-पाटील यांनी राजकारणात सर्वांना मास्तर म्हणून मार्गदर्शन केले. पद्मश्री विखे-पाटील यांच्या जीवनावर चित्रपट निर्माण व्हावा,” अशी सूचनाही त्यांनी यावेळी मांडली.

३६ वर्षांची पुरस्कारांची परंपरा – राधाकृष्ण विखे-पाटील
प्रास्ताविकात मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रवरा परिवाराच्या ३६ वर्षांच्या साहित्यिक वाटचालीचा आढावा घेतला. “ज्यांना आमचे पुरस्कार मिळाले, त्यांना पुढे साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठसारखे सर्वोच्च सन्मान मिळाले, याचा आम्हाला अभिमान आहे. मराठी संस्कृती आणि अभिरुची जपण्याचा हा आमचा नम्र प्रयत्न आहे,” असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले असून, अहमदनगर जिल्ह्यातील साहित्यप्रेमी आणि कार्यकर्त्यांनी या सोहळ्याला मोठी गर्दी केली होती . यावेळी पदमश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉ सुजय विखे पाटील यांनी आभार मानले .
Post Views: 129


