ऐतिहासिक! ३६ वर्षां होवून आधिक काळ चालणारा राजकीय संघर्ष मिटला

 

आश्वी । झुंझार न्यूज

अहिल्यानगर जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात गुरुवारी एक अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक घटना घडली. गेल्या साडेतीन दशकांहून अधिक काळ धुमसत असलेला विखे-पाटील आणि पवार कुटुंबातील राजकीय संघर्ष अखेर संपुष्टात आल्याचे चित्र पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी लोणी येथील जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. विशेष म्हणजे, पवार कुटुंबातील कोणत्याही सदस्याने विखेंच्या निवासस्थानी जाण्याची ही गेल्या अनेक वर्षांतील पहिलीच वेळ आहे.

सहकार चळवळीचे जनक डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि आप्पासाहेब पवार यांच्या काळात दोन्ही कुटुंबात सलोख्याचे संबंध होते. मात्र, त्यानंतरच्या काळात ज्येष्ठ नेते शरदराव पवार आणि दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्यात राजकीय मतभेद निर्माण झाले. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत हा संघर्ष टोकाला पोहोचला. या निवडणुकीनंतर विखे आणि पवार घराण्यातील वादाने न्यायालयीन लढायांपर्यंत मजल मारली होती. तेव्हापासून ‘विखे विरुद्ध पवार’ असा सामना जिल्ह्याच्या राजकारणात कायम पाहायला मिळत होता. मात्र, बदलत्या राजकीय परिस्थितीत सुनेत्रा पवार यांनी विखेंच्या वाड्यावर पाऊल ठेवल्याने या वादावर आता पडदा पडल्याचे मानले जात आहे.

या भेटीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, सुनेत्राताई पवार लोणीत येण्यापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची भेट घेतली होती. १९९१ च्या संघर्षात गडाख हे देखील केंद्रस्थानी होते. विखे-गडाख भेटीनंतर लगेचच सुनेत्रा पवार विखेंच्या वाड्यावर पोहोचल्याने, जिल्ह्यातील जुनी राजकीय समीकरणे बदलून नवे मैत्रीपर्व सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.


पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित साहित्य पुरस्कार सोहळ्यासाठी सुनेत्राताई पवार प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमापूर्वी विखे पाटील यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. सुनेत्राताई पवार यांचे आगमन होताच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी विखे कुटुंबाकडून पवारांचे आदरातिथ्य करण्यात आले.

या भेटीनंतर बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, आमचे चुलत सासरे प्रवरा परिसरात वास्तव्यास होते. सहकाराच्या माध्यमातून पवार आणि विखे या दोन्ही कुटुंबांचे जुने स्नेहाचे संबंध राहिले आहेत. आज येथे येऊन आनंद झाला.

माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या भेटीवर भाष्य करताना सांगितले की, “राजकारणात संघर्ष हा वैचारिक असतो, व्यक्तिगत वैर कधीही नसते. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत नामदार विखे पाटील यांनी अनेक वेळा मंत्रिमंडळात काम केले आहे. आज सुनेत्राताईंच्या रूपाने पवार कुटुंबीय पहिल्यांदाच आमच्या घरी आले, हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे.


या ऐतिहासिक क्षणी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्यासह आमदार प्रा. काशिनाथ दाते, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार संग्राम जगताप, आमदार आशुतोष काळे, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार अक्षय कर्डिले, अविनाश आदिक आणि प्रवरा परिवारातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

विखे आणि पवार यांच्यातील हा ‘समेट’ जिल्ह्याच्या आगामी जिल्हा बँक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठी उलथापालथ घडवून आणू शकतो. कट्टर विरोधक एकत्र आल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *