पुण्याचा विक्रम मोडला; ५ लाख २५ हजार भाविकांचा सहभाग, ‘विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद
झरेकाठी । झुंझार न्यूज
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र धनगरवाडी येथे सुरू असलेल्या संत योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाने आज सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहिला. श्रीक्षेत्र सरला बेटचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ५ लाख २५ हजार ५११ भाविकांनी एकाच वेळी ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. या अभूतपूर्व सोहळ्याने धनगरवाडीचा परिसर राष्ट्रभक्ती आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला होता.

पाच पटीने मोडला जुना विक्रम
यापूर्वी सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायनाचा विश्वविक्रम पुण्यातील ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या नावावर होता. १२ जानेवारी २०१० रोजी पुण्यात झालेल्या ‘अंतर्नाद’ कार्यक्रमात १ लाख ४ हजार ६३७ जणांनी एकत्र गायन केले होते. मात्र, धनगरवाडी येथील या सोहळ्यात तब्बल ५ लाख २५ हजार ५११ भाविकांनी सहभाग नोंदवत हा जुना विक्रम पाच पटींहून अधिक फरकाने मोडीत काढला.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण
या ऐतिहासिक कामगिरीची अधिकृत नोंद ‘विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ने घेतली आहे. सप्ताहाच्या मुख्य व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या विश्वविक्रमाचे अधिकृत प्रमाणपत्र महंत रामगिरी महाराज यांना प्रदान करण्यात आले. यावेळी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि १८४ विश्वविक्रम नावावर असलेले विनर्स बुकचे अध्यक्ष डॉ. दीपक हरके यांची प्रमुख उपस्थिती होती. विनर्स बुकच्या चेअरमन डॉ. ईशा अग्रवाल यांनीही या विक्रमाबद्दल आयोजकांचे विशेष अभिनंदन केले.

राजकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी
या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राजकारणातील आणि आध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. यामध्ये खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार विवेक कोल्हे, आमदार आशुतोष काळे, आमदार रमेश बोरनारे, आमदार अमोल खताळे, आमदार विठ्ठल लंघे, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सरला बेटचे विश्वस्त मधु महाराज यांसह अनेक मान्यवरांचा समावेश होता.

शिस्त आणि भक्तीचा संगम
एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय जमलेला असूनही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ‘वंदे मातरम्’चे गायन करण्यात आले. ५ लाखांहून अधिक आवाज जेव्हा एकाच सुरात ‘वंदे मातरम्’ म्हणू लागले, तेव्हा उपस्थित सर्वांच्याच अंगावर शहारे आले. गंगागिरी महाराजांच्या या १७९ व्या सप्ताहाने केवळ आध्यात्मिकच नव्हे, तर सामाजिक आणि राष्ट्रीय ऐक्याचा एक मोठा संदेश जगाला दिला आहे.

या विक्रमामुळे श्री क्षेत्र धनगरवाडी आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव आता जागतिक स्तरावर अभिमानाने झळकणार आहे.
.
