शिर्डी । झुंझार न्यूज


शिर्डीच्या ‘साई निर्माण ग्रुप’च्या वतीने आयोजित करण्यात आलेली ऐतिहासिक ‘शिर्डी-नेपाळ यात्रा‘ आणि १२ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा कोणत्याही अडथळ्याविना, नियोजित वेळेतच पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून नेपाळमधील परिस्थितीबाबत सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नसून, भाविकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन ‘साई निर्माण ग्रुप’चे अध्यक्ष विजयराव कोते यांनी केले आहे.

१५०० भाविकांचे स्वप्न होणार साकार


सुमारे दीड हजार शिर्डीकरांना १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडवण्याचे भव्य स्वप्न ‘साई निर्माण ग्रुप’ने उराशी बाळगले होते. या ऐतिहासिक यात्रेचे संपूर्ण नियोजन आता पूर्ण झाले असून सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे. या उपक्रमामुळे शिर्डीकरांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

प्रशासनाकडून ‘ग्रीन सिग्नल’; विखे पाटील यांच्याकडून परिस्थितीचा आढावा


नेपाळमध्ये नैसर्गिक आपत्ती आल्याच्या काही बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने यात्रेकरूंमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, राज्याचे महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी नेपाळ सरकार आणि तेथील स्थानिक प्रशासनाशी थेट चर्चा करून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आहे.

नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिर परिसर आणि यात्रेचा मार्ग पूर्णपणे सुरक्षित असून प्रशासनाने यात्रेसाठी हिरवा कंदील दाखवला आहे. महसूलमंत्री विखे पाटील स्वतः या यात्रेच्या नियोजनावर लक्ष ठेवून असून, यात्रेच्या मार्गावर भाविकांचे जंगी स्वागतही केले जाणार आहे.

 

अफवांना बळी पडू नका: विजयराव कोते


याबाबत अधिक माहिती देताना विजयराव कोते म्हणाले की, “सोशल मीडियावर पसरणारे मेसेज चुकीचे आहेत. ज्या घटनेचा उल्लेख केला जात आहे, त्याचा पशुपतीनाथ परिसराशी कोणताही संबंध नाही. तेथील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणि सुरक्षित आहे. साई भक्तांच्या सुरक्षेची आम्ही पूर्ण काळजी घेतली आहे. ही यात्रा अत्यंत आनंदमय आणि भक्तीपूर्ण वातावरणात पार पडेल. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये.”


साई निर्माण ग्रुपचे उपाध्यक्ष पंकज लोढा आणि सर्व कार्यकर्ते रात्रंदिवस या यात्रेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. प्रशासकीय परवानगी आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ही यात्रा पार पडणार आहे. ऐतिहासिक स्वरूपाच्या या १२ ज्योतिर्लिंग दर्शनासाठी आता सर्व भाविक सज्ज झाले असून, शिर्डीतून निघणाऱ्या या जथ्थ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

भाविकांनी कोणत्याही संभ्रमात न राहता या मंगल सोहळ्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *