साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डी नगरीत आज भक्तिमय वातावरणात एका ऐतिहासिक तीर्थयात्रेचे प्रस्थान झाले. ‘श्री साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘साई निर्माण ग्रुप’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्री साई सच्चरित पारायण तीर्थयात्रा २०२६ (संकल्प पूर्ती)’ अंतर्गत तब्बल १५०० साईभक्त श्री क्षेत्र काशी, प्रभू श्रीरामाची अयोध्या आणि नेपाळमधील पवित्र देवस्थानांच्या दर्शनासाठी रवाना झाले आहेत.
यात्रेच्या प्रस्थान सोहळ्यानिमित्त शिर्डीत दिवाळीसारखा उत्साह पाहायला मिळाला.टाळ-मृदंगाचा गजर, भजनांचे सूर आणि ‘जय साईराम’ च्या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला होता.साईबाबांच्या पालखीचे आगमन होताच भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला. या १५०० भाविकांच्या जथ्थ्यामध्ये महिला, तरुण आणि ज्येष्ठांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असून, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तीर्थयात्रेचा आनंद स्पष्ट दिसत होत
या भव्य प्रस्थान सोहळ्याला शिर्डीतील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. कैलास बापू कोते (माजी नगराध्यक्ष): “हा साईभक्तांच्या श्रद्धेचा महाकुंभ आहे. काशी, अयोध्या आणि नेपाळ यांसारख्या पवित्र भूमीचे दर्शन मिळणे हे भाग्याचे लक्षण आहे.
विजयराव कोते: “ही केवळ एक सहल नसून हा एक आध्यात्मिक संकल्प आहे. शिर्डीतील भाविकांना एकाच वेळी प्रमुख देवस्थानांचे दर्शन घेता यावे, हा यामागचा पवित्र हेतू आहे.
पंकज लोढा: “१५०० भाविकांचा हा प्रवास सुखकर व्हावा यासाठी निवास, भोजन आणि सुरक्षेची अत्यंत चोख व्यवस्था करण्यात आली आहे.”
यावेळी उद्योजक भाऊसाहेब चौधरी, चांगदेव जगताप, पप्पू जगताप यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या भव्य उपक्रमाला राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. तसेच, यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी भिम शक्ती संघटना, साई रेल्वे स्टेशन प्रशासन, बस स्थानक प्रशासन आणि टँक्सी संघटना यांचेही मोठे सहकार्य लाभले.
ही तीर्थयात्रा श्री क्षेत्र काशी (वाराणसी) येथून सुरू होऊन प्रभू श्रीरामाच्या अयोध्या नगरीत पोहोचेल. त्यानंतर भाविक नेपाळमध्ये प्रवेश करून तेथील प्रसिद्ध मनोकामना मंदिर आणि श्री पशुपतीनाथ मंदिराचे दर्शन घेतील. २०२६ च्या ‘संकल्प पूर्ती’च्या उद्देशाने आयोजित केलेल्या या यात्रेची सध्या संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू असून, शिर्डीकरांच्या या श्रद्धेच्या प्रवासाला सर्वच स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
“डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, ‘या यात्रेत तुमच्या संगेच साक्षात साईबाबांचे आशीर्वाद आहेत. शिर्डीतील १५०० भाविक जेव्हा एकत्र मिळून काशी-विश्वेश्वर आणि प्रभू श्रीरामाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जातात, तेव्हा ती केवळ एक यात्रा उरत नाही, तर तो श्रद्धेचा एक महाकुंभ बनतो. या प्रवासात तुमची भक्ती आणि आमची शुभेच्छा सदैव तुमच्या सोबत राहतील. तुमचा हा प्रवास सुखकर आणि मंगलमय व्हावा हीच बाबांच्या चरणी प्रार्थना!’