१०३ विद्यार्थ्यांमध्ये विविध नेत्रविकार आढळले; स्क्रीन टाइम आणि २०-२०-२० नियमाबाबत मार्गदर्शन

 

संभाजीनगर । झुंझार न्यूज

 

हायटेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयातर्फे पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एका दिवसात तब्बल ४१६ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान १०३ विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारचे नेत्रविकार आढळून आले. यामध्ये प्रामुख्याने High Myopia , केराटोकोनस सस्पेक्ट, तिरळेपणा (Squint), डोळ्यांचा आळशीपणा (Amblyopia) तसेच Accommodation Spasm यांसारख्या समस्या आढळल्या. योग्य वेळी निदान करून आवश्यक उपचार केल्यास विद्यार्थ्यांच्या दृष्टीचे भविष्यातील नुकसान टाळण्यास तसेच त्यांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मोठी मदत होते, असे डॉ. अर्पिता पेशट्टीवार (कर्डीले) यांनी सांगितले.

यावेळी डॉ. अक्षय कर्डीले यांनी विद्यार्थ्यांना डोळ्यांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. वाढता स्क्रीन टाइम, मोबाईल व संगणकाचा अतिवापर यामुळे डोळ्यांवर होणारे परिणाम समजावून सांगताना त्यांनी स्क्रीन टाइम कमी करण्याचे उपाय तसेच दैनंदिन जीवनात २०-२०-२० नियमाचा योग्य प्रकारे अवलंब कसा करावा, याबाबत विद्यार्थ्यांसह शिक्षकांना मार्गदर्शन केले.

या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेत्रआरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच लवकर निदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल हायटेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य व शिक्षकवृंद यांनी डॉ. लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार मानले. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात यावेत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *