जैन धर्मातील अत्यंत पवित्र आणि आत्मशुद्धीचा काळ मानल्या जाणाऱ्या आठ दिवसीय पर्युषण पर्वाची सांगता मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी जागतिक क्षमापना दिनाने भक्तिमय वातावरणात झाली. यानिमित्त आश्वी वर्धमान जैन स्थानक येथे विविध धार्मिक, आध्यात्मिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पर्युषण पर्वाच्या काळात पुणे येथून आलेल्या ज्येष्ठ स्वाध्यायी सौ. ज्योती प्रवीणजी ताथेड, सौ. उज्ज्वला दिलीपजी भटवेरा आणि सौ. पायल शुभमजी गेलडा यांच्या ज्ञानवर्धक धर्मप्रवचनांचा लाभ आश्वीतील श्रावक-श्राविकांनी मोठ्या संख्येने घेतला. त्यांच्या प्रवचनांमुळे परिसरात भक्ती, अध्यात्म आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
आठ दिवसांच्या कालावधीत पहाटे प्रतिक्रमण, अखंड नवकार महामंत्र जप, प्रार्थना, अंतर्गढ सूत्र, चौपाई, सायंकाळी प्रतिक्रमण तसेच विविध धार्मिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. श्रावक-श्राविकांनी एकासणा, आयंबिल, उपवास, बेला, तेला आदी विविध प्रकारच्या तपश्चर्येत उत्स्फूर्त सहभाग घेतला. जप, तप, संयम आणि दानाच्या माध्यमातून पर्युषण पर्वाची साधना करण्यात आली.
आनंद जैन पाठशाळेतील विद्यार्थ्यांनीही धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पर्वाच्या काळात आयंबिल, ब्यासणा, एकासणा आणि ब्याळूची व्यवस्था किशोर पटवा, सुम्मतीलाल रातडीया आणि निलेश रातडीया यांच्या वतीने करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्ना रातडीया यांनी केले. जागतिक क्षमापना दिनानिमित्त परस्परांप्रती झालेल्या चुका, मनातील कटुता आणि गैरसमज विसरून एकमेकांना ‘मिच्छामि दुक्कडम्’ म्हणत क्षमायाचना करण्यात आली.
आठ दिवसीय पर्युषण पर्वाचे सर्व कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुम्मतीलाल गांधी यांच्यासह अमरचंद गांधी, सुम्मतीलाल रातडीया, वसंतलाल गांधी, मिलिंद बोरा, संजय गांधी, विनीत गांधी, अभिजीत गांधी, निलेश रातडीया, रामचंद्र भंडारी, किशोर पटवा, दिलीप पटवा, राजेंद्र भंडारी, भूषण भंडारी, योगेश लुकंड, राजेंद्र लुनिया, श्रेणीक बोरा, योगेश रातडीया, रोहित भंडारी, प्रशांत गांधी, प्रित गांधी, नितीन गांधी, आश्वीन मुथ्था, सतीश गांधी, विशाल गांधी, दीपक बोरा, नेमीचंद भंडारी, निलेश चोपडा, प्रितम गांधी, रोशन रातडीया, अथर्व रातडीया, युग लुंकड, संयम लुंकड, शुभम पटवा, अनिकेत पटवा, राज पटवा, आदर्श गांधी, शुभ बोरा आणि अॅड. सनी भंडारी यांनी परिश्रम घेतले.