{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

​आश्वी । झुंझार न्यूज

समाजात पैशाने श्रीमंत असणारे अनेक जण असतात, परंतु पैशांसोबतच मनाने श्रीमंत होऊन समाजातील दीन-दुबळ्यांसाठी आणि गरजूंसाठी आपल्या संपत्तीचा खजिना खुला करणारे व्यक्तिमत्व विरळाच! अशाच अष्टपैलू, दानशूर आणि शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्वाचे नाव म्हणजे डॉ. नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. ठाणे येथील ‘नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला ट्रस्ट’च्या माध्यमातून आरोग्यापासून ते शिक्षणापर्यंत आणि सामाजिक कार्यापासून ते अध्यात्मापर्यंत त्यांनी उभे केलेले कार्य अवाक करणारे आहे.

​आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात असीम योगदान
​ठाण्यामध्ये नानजीभाईंचा असा एक ट्रस्ट आणि रुग्णालय आहे, जिथे रुग्णांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांचा (ऑपरेशन्स) संपूर्ण खर्च हॉस्पिटल स्वतः करते. एवढेच नाही तर रुग्णासोबत राहणाऱ्या एका नातेवाईकाच्या राहण्याचा आणि जेवणाचा खर्चही अगदी मोफत केला जातो.


​

केवळ आरोग्यच नव्हे, तर शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचा हातभार मोठा आहे. अलिकडेच सह्याद्री संस्थेच्या कुरण येथील ‘सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात उर्दू हायस्कूल’च्या नवीन इमारतीसाठी मदतीची गरज असताना, श्रीकांत सहाणे यांच्या सहकार्याने नानजीभाईंशी संपर्क साधण्यात आला. अवघ्या तीन दिवसांत त्यांनी वेळ दिली आणि शाळेच्या दोन वर्गखोल्या, पॅसेज, गॅलरी, पोर्च व शापोआ खोलीच्या फरशीकामासाठी ताबडतोब मंजुरी देऊन भरीव मदत केली. कामाचा प्रस्ताव आणि फोटो पाहताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता फाईलवर स्वाक्षरी केली.


​

आजपर्यंत देशभरातील ५,००० हून अधिक शाळा, महाविद्यालये, धर्मशाळा, मंदिरे, मशिदी आणि चर्च यांना नानजीभाईंनी सढळ हाताने मदत केली आहे. मदतीबाबत बोलताना ते ठामपणे सांगतात:
​”माझे काम हे सर्वधर्मसमभावाचे आहे. आपल्या सर्वांचा जनक ईश्वर एकच आहे आणि आपण सर्व त्याचीच लेकरे आहोत. त्यामुळे माझ्या दारात येणाऱ्या कोणत्याही धर्मीय व्यक्तीला मदतीसाठी कधीही नकार दिला जात नाही.


​नानजीभाईंचा जन्म २३ सप्टेंबर १९४४ रोजी गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील ‘नंदासर’ या छोट्या खेड्यात झाला. कौटुंबिक परिस्थितीमुळे त्यांचे शिक्षण केवळ चौथीपर्यंतच झाले. मात्र, परिस्थितीचा बाऊ न करता त्यांनी जन्मभूमी सोडली आणि महाराष्ट्राला आपली कर्मभूमी बनवले. सुरुवातीच्या काळात स्वतः नोकरी करून, प्रसंगी फुटपाथवर झोपून, अत्यंत प्रामाणिकपणे आणि चिकाटीने त्यांनी स्वतःचे दुकान सुरू केले. कष्टाच्या जोरावर त्यांनी अनेक उद्योगधंदे उभारले आणि त्यातून मिळालेला पैसा समाजकार्यात लावला. त्यांच्या या उद्योग कौशल्यामुळे त्यांना ‘उद्योगरत्न’ या किताबाने सन्मानित करण्यात आले.

अवघी चौथीपर्यंत शिकलेल्या या अवलियाने उभारलेल्या अभूतपूर्व सामाजिक कार्याची दखल घेऊन श्रीलंकेच्या सरकारने त्यांना पीएच.डी. (डॉक्टरेट) पदवी बहाल केली.


​आज वयाच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करत असतानाही नानजीभाई २४ तास आणि ३६५ दिवस समाजकार्यासाठी कार्यरत असतात. तरुणांना लाजवेल अशी ऊर्जा त्यांच्यात आहे. स्वतःच्या वयाबद्दल विचारले असता ते हसून ‘४० वर्षे’ असेच सांगतात! घर आणि कुटुंबाबद्दल बोलताना ते म्हणतात, “घरातील स्त्री ही लक्ष्मीचे रूप असते. तिला हसत ठेवले तर घरात सुख-समृद्धी धावून येते.” त्यांच्या या कार्याला त्यांची धर्मपत्नी सौ. धनलक्ष्मीबेन तसेच दोन्ही मुले जितेंद्र आणि परेश पूर्ण पाठिंबा देतात. माणसात देव पाहा, घरात कोणतेही व्यसन ठेवू नका, घराला मंदिरासारखे बनवा आणि सामाजिक बांधिलकी जपा,” हेच त्यांच्या उर्जायुक्त आणि दीर्घ आयुष्याचे रहस्य आहे.


​डॉ. नानजीभाई हे ‘एन. के. टी. चॅरिटेबल ट्रस्ट’चे अध्यक्ष असून, तब्बल ४०० हून अधिक संस्थांचे दाता आणि विश्वस्त आहेत. भारतासोबतच परदेशातही त्यांचे कार्य विस्तारलेले आहे. अमेरिकेतील न्यू जर्सी येथेही त्यांची संस्था कार्यरत आहे. नुकतेच कोलकात्याजवळ ८०० कोटींहून अधिक खर्चाच्या कृष्णाच्या ६०० एकर जमिनीवरील मंदिराच्या पायाभरणीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. ५४ देशांच्या प्रतिनिधींसमोर त्यांनी दिलेले प्रबोधनात्मक भाषण अत्यंत गाजले.


​जनतेने दिलेली ‘दानशूर’, संतांनी दिलेली ‘धर्मात्मा’, शिक्षण क्षेत्रातील ‘शिक्षण महर्षी’ आणि समाजाने दिलेली ‘समाजरत्न’ ही विशेषणे डॉ. नानजीभाई यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला आणि कार्याला अगदी साजेशी ठरतात. २३ सप्टेंबर रोजी साजरी झालेल्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या या निष्काम सेवाकार्याला आणि महान व्यक्तिमत्त्वाला मानाचा मुजरा! 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *