शेतकऱ्यांना तातडीने भरघोस मदत मिळाली पाहिजे–माजी मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर । झुंझार न्यूज
राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला मदतीची अत्यंत गरज आहे. याचबरोबर अचानक आलेल्या पावसाने हिवरगाव पावसा येथे मोठे नुकसान झाले असून आता पंचनामे न करता या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याबरोबर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना संकट काळात मदत करा अशी मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

हिवरगाव पावसा येथे अचानक आलेल्या पावसाने शेडनेट कागद व घरांची मोठी नुकसान झाली या नुकसानीची मा. महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाहणी केली यावेळी समवेत डॉ. प्रमोद पावशे, डॉ. संदीप पावशे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

काल अचानक आलेल्या पावसाने हिवरगाव पावसामध्ये शेतकऱ्यांच्या विविध पिकांसह शेडनेट कागद , घरांचे पत्रे व कौले यांची नुकसान झाले यामुळे आधीच आर्थिक अडचणी सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिलासा दिला.
यावेळी ते म्हणाले की यावर्षी 1972 पेक्षाही भयानक दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आता तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे कारण राज्यामध्ये पशुधन मोठे आहे. पाणी व्यवस्थापन केले पाहिजे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे न करता तातडीने मदत दिली पाहिजे. दुष्काळग्रस्त सर्व शेतकऱ्यांना एकरी मदत देताना कोणत्याही पंचनामा नको सरसकट आणि मोठी मदत द्या जेणेकरून अशा संकट काळामध्ये शेतकरी उभा राहील.



