आ.लंघे, आ खताळ, लोखंडे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल
संगमनेर । झुंझार न्यूज
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच रंगली असून, विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनेही जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेत जिल्हा बँकेत शिरकाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून संगमनेर तालुक्यातून शिवसेनेच्या वतीने तीन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विविध राजकीय गटांकडून उमेदवार रिंगणात उतरविले जात असल्याने आगामी काळात निवडणुकीतील राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होणार आहेत. या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीने शिवसेनेला विश्वासात न घेता निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, आता उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सर्वच नेत्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत स्वतंत्रपणे ताकद दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चुरस वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातून आपले उमेदवार मैदानात उतरवित शिवसेनेने सहकारातील नेत्यांसमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील चुरस वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ व माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेती सहकारी संस्था मतदारसंघातून निमज येथील बादशाह दत्तू गुंजाळ, शेतीपूरक व शेतीमाल प्रक्रिया व पणन संस्था मतदारसंघातून मंगळापूर येथील शंकर मारुती वाळे, तर अनुसूचित जाती-जमाती राखीव मतदारसंघातून पंढरीनाथ माधव इल्हे यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले, कमलाकर कोते, रावसाहेब खेवरे, प्रशांत लोखंडे, विठ्ठल घोरपडे, रमेश काळे, रामभाऊ राहणे, राजेंद्र सोनवणे, दादाभाऊ गुंजाळ, डॉ. संतोष डांगे, दत्तात्रय दिघे, शशिकांत मतकर यांच्यासह संगमनेर, अकोले व श्रीरामपूर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.